सावकारी कर्जापोटी गरीब शेतक-यांची कोटय़वधी रुपयांची जमीन बळकावणा-या सावकारी टोळीला बुधगाव येथे गुंडा विरोधी पथकाने अटक केली. मुख्य संशयीतांमध्ये बुधगावचा माजी सरपंच गणेश पाटील याचा समावेश असून टोळीतील तिघेजण फरार झाले आहेत.
सिद्धेश्वर आत्मा भगत यांची ८९ गुंठे शेतजमीन दहशतीच्या बळावर लाटण्याचा या टोळीचा उद्योग चौकशीत उघड झाला आहे. सिद्धेश्वर भगत यांनी माजी सरपंच यांच्या मध्यस्थीने कर्नाळ येथील सतीश पाटील याच्याकडून जून २०११ मध्ये दीड लाखांचे कर्ज घेतले होते. या बदल्यात जमिनीची मुदत खरेदी करून घेण्यात आली. कर्ज व व्याजापोटी चार लाखांच्या वसुलीसाठी टोळीकडून भगत यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात येत होती.
या संदर्भात माजी सरपंच गणेश पाटील याच्यासह आत्माराम आटपाडकर, दत्तात्रय माने, चंद्रकांत घोडके या चौघांना अटक केली असून रवींद्र जखोटिया, सावकार सतीश पाटील व मधुकर माने हे तिघे अद्याप फरार आहेत. या टोळीविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.