औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यामध्ये आज सकाळच्या सुमारास पेरणीची कामं करण्यासाठी शेतांमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने एकच खळबळ माजली. बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये आठ शेतकरी जखमी झाले आहेत.
वैजापूर तालुक्यामधील शिवराई येथील शेतांमध्ये ही घटना घडली. सध्या पेरणीचे दिवस सुरु असल्याने सकाळपासूनच अनेक शेतकरी शेतात राबत असतात. अशातच आज सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेकतरी शेतात काम करत असताना हा बिबट्या अचानक त्यांच्या समोर आला. बिबट्याला पाहून शेतकऱ्यांची एकच धापवळ उडाली. त्यामुळे ते सैरवैर धावू लागले. या गडबड गोंधळामुळे बिथरलेल्या बिबट्याने समोर दिसेल त्याच्यावर पंजांनी हल्ला करत चावा घेतला. या सर्व गोंधळामध्ये बिबट्याने आठ जणांना जखमी केले. त्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.
झालेल्या सर्व प्रकरामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. शिवराई येथील शिवारात बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून ऐकण्यात होत्या. मागील काही दिवसांपासून वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहे मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यातच हा हल्ला झाल्याने वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 11:01 am