22 January 2019

News Flash

पुण्याजवळ या भागात बिबट्या करतो मोटर सायकलचा पाठलाग

पुण्यापासून 80 किलोमीटरवर असलेल्या जुन्नरजवळ शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून गावकऱ्यांनी केली मदत

संग्रहित छायाचित्र

मोटरसायकलवरून जात असलेल्या नवरा-बायकोचा क्षणभर स्वत:वर विश्वास बसला नाही, कारण चक्क एक बिबट्या त्यांचा पाठलाग करत होता. पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नरनजीक शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. महेंद्र वामन त्यांच्या पत्नीसह वडगाव आनंद वरून काळेवाडीला जात होते. पत्नीच्या लक्षात आलं की जंगलातून एक बिबट्या रस्त्यावर आला आहे आणि तो आपल्या मागेच आहे.

आधी विश्वास न बसलेल्या पत्नीनं महेंद्रच्या ही बाब लक्षात आणून दिली. बिबट्या पाठलाग करतोय हे बघितल्यानंतर महेंद्रने मोटरसायकलचा वेग आणखी वाढवला आणि सुसाट वेगाने ते बिबट्याला चकमा द्यायचा प्रयत्न करू लागले. परंतु बिबट्याने काही पाठलाग सोडला नाही, आणि तो ही वेगाने मागून येऊ लागला.

जवळपास शंभरेक मीटर गेल्यावर व बिबट्या माग सोडत नाही असं दिसल्यावर दोघांनी आरडाओरड करून आजुबाजुच्या गावात मदतीचा हाकारा केला. सुदैवानं गावकऱ्यांनी त्यांच्या हाका ऐकल्या व ते मदतीला धावले. मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांना बघितल्यावर मग बिबट्यानं पळ काढला. संध्याकाळी काळोख पडल्यानंतर या रस्त्यावरून जाणं धोकादायक झाल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. वनाधिकाऱ्यांनीही आपल्याकडे मोटरसायकलस्वारांचा बिबटे पाठलाग करत असल्याच्या तक्रारी आल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे मोटकसायकलचा अथवा गाडीचा पाठलाग करणं बिबट्याच्या नैसर्गिक भावनेविरुद्ध आहे. तरीही हे प्रकार घडत असल्यामुळे यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न वनाधिकारी करत आहेत. काही वर्षांपूर्वी एक मादी जातीची बिबट असा गाड्यांचा पाठलाग करताना आढळली होती. अधिक माहिती काढता त्या मादीची पिल्लं रस्ते अपघातात मरण पावली होती, त्यामुळे ती गाड्यांचा पाठलाग करायची.

जुन्नरमध्ये 500 चौरस किलोमीटरमध्ये 70 बिबटे असून ही जास्त घनता मानली जाते. ऊसाचे मळे या भागात असल्यामुळे बिबट्यांना लपून बसण्यासाठी चांगला आसरा मिळतो आणि त्यांना दबा धरून बसता येते. त्यामुळे काळोख पडल्यानंतर या भागात रस्त्यावरून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on April 16, 2018 4:43 pm

Web Title: leopard chases husband wife riding on motor bike