जालना, औरंगाबादपासून ते बीड व नगरनंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात गेले अनेक दिवस दहशत माजवून १२ व्यक्तींचे बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर शुक्रवारी सायंकाळी वन खात्याने गोळ्या घालून ठार मारले. करमाळ्याजवळ वांगी येथे एका केळीच्या बागेत वनखात्या नेमबाजांनी यशस्वी निशाणा साधून बिबट्याला ठार मारले.

सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वांगी (क्र.४) गावच्या शिवारात रांखुंडे वस्तीवर पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत दडून बसलेला बिबट्या वनखात्याच्या नजरेस पडला आणि कोणतीही संधी न देता बिबट्याला तेवढ्याच चपळाईने गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे बिबट्याची दहशत आखेर संपुष्टात आली.

जालना, औरंगाबाद, बीड व अहमदनगर येथे दहशत माजवून नऊजणांचे बळी घेणाऱ्या बिबट्याने गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात करमाळा भागात शिरकाव करून दहशत माजवायला सुरूवात केली होती. सर्वप्रथम भिलारवाडी येथे बिबट्याने गायवासरावर हल्ला केला होता. गाय-बैल, शेळ्या-मेंढ्यांना भक्ष्य बनविणारा हिंस्त्र श्वापद हा बिबट्याच असल्याची खात्री वनखात्यालाही झाली नव्हती. मात्र त्यानंतर चार-पाच दिवसांत एका पाठोपाठ एक तीन जीवांचे बळी गेले असता अखेर हे बिबट्याचेच काम असल्याची खात्री पटली आणि वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न हाती घेतले. उजनी धरण व जलाशयाचा विस्तीर्ण भाग असल्यामुळे तसेच या भागात ऊस व केळीचे क्षेत्र सलग असल्यामुळे बिबट्याला पकडणे सहज सुलभ नव्हते.

या पार्श्वभूमीवर वनखात्यावर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून सतत दबाव वाढला होता. यातच बिबट्याबाबत अफवांचे पेव पसरले होते. लिंबेवाडी, अंजनडोह, चिखलठाण, वांगी, बिटरगाव, कंदर, उंदरगाव आदी भागात मोठ्या प्रमाणावर सापळा पिंजरे आणि सापळा कॅमेरे लावून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. निष्णात नेमबाजांनाही पाचारण करण्यात आले होते. अंजनडोह व बिटरगाव येथे दोनवेळा नेमबाजांनी गोळ्या झाडूनही त्यातून बिबट्याने चपळाईने पळ काढला होता. वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत महाडिक, धवल मोहिते व हर्षवर्धन तावरे या कसलेल्या नेमबाजांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागात रात्रंदिवस शोध सुरू केला होता. परंतु अलीकडे चार दिवसांपासून बिबट्या कोठेही आढळून येत नव्हता. ताणतणाव किंवा आजारी पडून बिबट्या कोठेतरी मृत्युमुखी पडला असावा, असाही कयास व्यक्त होत होता. परंतु अखेर शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे वांगी येथे बिबट्या नेमबाजांच्या नजरेस पडला आणि क्षणार्धात त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

धवलसिंह मोहिते-पाटलांनी झाडल्या गोळ्या

करमाळा तालुक्यात दहशत माजविणा-या बिबट्याला अकलूजचे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सुमारे १५ अंतरावरून आपल्या बारा बोअरच्या रायफलीने अचूकपणे तीन गोळ्या झाडल्या. मोहिते-पाटील हे दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. वन खात्याच्या मोहिमेत इतर नेमबाजांसह धवलसिंह हेदेखील सहभागी झाले होते.