25 September 2020

News Flash

भूक, आजारपणामुळे घायाळ बिबटय़ाचा उपचारादरम्यान मृत्यू

सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील बिबटे उपासमारीमुळे मृत पावत असल्याच्या दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. काल कराडजवळील विंग येथील कणसे मळय़ात उसाच्या शेतात आढळलेला बिबटय़ा आज येथील पशुवैद्यकीय

| June 19, 2014 03:42 am

सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील बिबटे उपासमारीमुळे मृत पावत असल्याच्या दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. काल कराडजवळील विंग येथील कणसे मळय़ात उसाच्या शेतात आढळलेला बिबटय़ा आज येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारादरम्यान, उपासमार व आजारपणामुळे गतप्राण झाला.
गेल्या १५ दिवसांपूर्वी पर्यावरणदिनीच पाटण तालुक्यातील गारवडे येथे उपासमार व आजारपणामुळे हवालदिल असलेला बिबटय़ा वनखाते व परिसरातील ग्रामस्थ पकडत असताना त्याच्या गळय़ाला दोरीचा फास लागून, मृत पावल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज आणखी एका बिबटय़ाचा मृत्यू झाल्याने पर्यावरणप्रेमी व वन्यजीवप्रेमी मंडळींकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा बिबटय़ा मादी जातीचा सुमारे दीड वर्षांचा होता. काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विंग (ता. कराड) येथील कणसे मळय़ात उसाच्या शेतात हा बिबटय़ा झोपलेल्या अवस्थेत जयवंत कणसे व संतोष कणसे यांना आढळून आला. शेतकामासाठी ऊसक्षेत्रात गेलेले जयवंत व संतोष हे तेथून लगेचच बाहेर पडले आणि त्यांनी याबाबतची खबर वनखात्यास दिली. यावर वनक्षेत्रपाल भरत पाटील, बी. के. जाधव व त्यांच्या सहका-यांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. लांबून बिबटय़ाचे निरीक्षण केल्यानंतर बिबटय़ा उपासमारीमुळे अशक्त झाला असून, तो जखमीही असल्याचा अंदाज वनअधिका-यांनी बांधला. त्यांनी मोठय़ा चातुर्याने बिबटय़ास पिंज-यामध्ये बंदिस्त करून तत्काळ कराडच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. येथे या बिबटय़ावर सत्वर इलाज चालू करण्यात आले. आज त्यास बोरवली अथवा जुन्नर येथील बिबटय़ांसाठीच्या विशेष रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बिबटय़ाची प्राणज्योत मालवली. उत्तरीय तपासणीत बिबटय़ाच्या फुफ्फुसामध्ये निमोनियाचा प्रार्दुभाव झाल्याचे तसेच त्याची उपासमार झाली असताना अतिसाराचा त्रास होऊन, दरम्यान त्याने कुजलेले मांस खाल्ल्याने त्याची प्रकृती अधिकच खालावली. परिणामी, उपासमार व आजारपण अशा कारणांमुळे बिबटय़ाचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. सह्याद्रीच्या वनक्षेत्रातील हिंस्र श्वापदांचे भक्ष्य शिका-यांनी मेजवानीस संपवत आणल्याने सह्याद्रीच्या डोंगर परिसरानजीकच्या मानवी वस्तीत बिबटय़ांची भुकेपोटी घुसखोरी वाढली आहे. तर शेतपिकात भुकेने व्याकूळ बिबटे आढळून येताना त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी कराडच्या सिटीपोस्ट परिसरात भरदुपारी बिबटय़ा अवतरला आणि बघ्यांनी त्यास डिवचल्याने तो बिथरून झालेल्या धुमाकुळात दहा नागरिक किरकोळ व गंभीर जखमी होताना एका तरुणावर बिबटय़ाने जीवघेणी झडप घातली असताना पोलिसांना या बिबटय़ावर गोळी झाडून त्यास ठार मारणे भाग पडले. तर वरचेवर नागरीवस्तीच्या परिसरात बिबटय़ांचे दर्शन घडत असून, त्याच्याशी संघर्षही होत आहे.   मुख्यत्वे उपासमारीमुळे बिबटे मृत्यू पावत असल्याच्या घटना घडत आहेत. तरी बिबटय़ांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा कळीचा प्रश्न भेडसावत आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 3:42 am

Web Title: leopards death because of appetite and sickness during treatment 2
Next Stories
1 वाळू माफियांकडून हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन
2 नव्या ऊस हंगामाचा ऑक्टोबरमध्ये प्रारंभ
3 पंढरपुरात मंत्र्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी टाकला कचरा
Just Now!
X