कुष्ठरुग्णांना बाहेरचा रस्ता, आरोग्य शिबिरेही बंद  

देवेंद्र गावंडे, नागपूर</strong>

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

आनंदवनाची उभारणी करताना बाबांनी एक भव्य स्वप्न पाहिले होते. हा प्रकल्प ‘आरोग्याची राजधानी’ म्हणून ओळखला जावा, असा त्यांच्या स्वप्नाचा आशय होता. त्याकडे नेटाने वाटचाल करताना त्यांनी अतिशय तुटपुंज्या साधनांवर आनंदवनात रुग्णालयांची उभारणी केली. नंतर हळूहळू ही रुग्णालये विविध अद्ययावत साधनांनी सुसज्ज होत गेली. आजही ती सुसज्जावस्थेत आहेत; पण तिथे केवळ एक वयोवृद्ध डॉक्टर आहे. त्यामुळे ती कायम बंदच असतात. पूर्वी प्रत्येक जानेवारी महिन्यात डॉ. तात्याराव लहाने येथे मोठे नेत्रशस्त्रक्रिया शिबीर घेत असत. केवळ आनंदवनच नाही, तर पंचक्रोशीतील गरजू त्याचा लाभ घेत असत. आता हे शिबीरच नव्या व्यवस्थापनाने बंद केले आहे. केवळ याच नाही, तर अनेक आरोग्य शिबिरांवर आनंदवनात आता गदा आली आहे. पूर्वी येथे प्लास्टिक सर्जरी, तिरळे डोळे सरळ करणे यांसारखी अनेक शिबिरे होत असत. ती पण बंद करण्यात आली. नेत्रशिबिरासाठी लागणारी नोंदणी रद्द झाल्याने आणि त्याचे वेळेत नूतनीकरण न झाल्याने ते थांबवावे लागले, असे शीतल करजगी यांनी सांगितले; पण समोर आलेली माहिती वेगळीच आहे. या नेत्रशिबिराचा सर्व खर्च डॉ. लहाने बाहेरूनच उभा करीत असत. रुग्णालय आणि निवास व्यवस्थेचा वापर केला म्हणून आनंदवनला पाच लाख रुपये द्यायचे. तशी कबुलीसुद्धा लहाने यांनी दिली. तरीही नव्या व्यवस्थापनाने शिबीर आयोजित करणे शक्य होणार नाही, असे डॉ. लहानेंना कळवून टाकले. यामुळे ते कमालीचे दुखावले आणि त्यांनी शिबीर बंद करण्याबरोबरच आनंदवनात येणेही थांबवले. खुद्द लहानेंना विचारले तर ते यावर फार बोलत नाहीत. कशाला जुने उकरून काढायचे, असे ते म्हणाले. आता वरोराऐवजी यवतमाळ येथे शिबीर घेणे सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले. बाबांच्या आरोग्य राजधानीच्या संकल्पनेला सलग हातभार लावू शकलो नाही, अशी खंत त्यांच्या बोलण्यातून सतत व्यक्त होत राहते. आता शीतल आणि विकास आमटेंनी पुन्हा शिबीर घेण्याची विनंती केली आहे, त्यास आमचीही तयारी आहे असे डॉ. लहाने म्हणाले.

नव्या व्यवस्थापनाने येथील लोकांवर जो अन्याय केला त्याच्या कथा फेरफटका मारताना ऐकवल्या जातात. त्यातल्या राजू सौसागडे या दलित कार्यकर्त्यांने तेवढी पोलिसांत जाण्याची हिंमत केली. बाकीची प्रकरणे कधी बाहेर आलीच नाहीत. त्याची चर्चा मात्र होत राहिली. या साऱ्यांमुळे अस्वस्थ झालेले अनेक ‘कर्तेधर्ते’ आनंदवन सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.

कार्यकर्त्यांच्या ‘छळकथा’

राजू हा विकास आमटेंच्या अगदी जवळचा. गेली अनेक वर्षे त्यांचा स्वीय साहाय्यक म्हणून काम बघत आलेला. अतिशय उत्साही कार्यकर्ता अशी त्याची ओळख सर्वदूर पसरलेली. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून त्याच्या छळाला सुरुवात झाली. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले गेले. त्याला कार्यकर्ता पदावरून दूर करण्यात आले. त्याच्या फिरण्यावर बंधने आणण्यात आली. सुरुवातीला तो बावचळला. नंतर त्याने नेटाने प्रतिकार करायला सुरुवात केली. आरोप काय याची विचारणा माहितीच्या अधिकारात केली. त्यामुळे चिडलेल्या नव्या व्यवस्थापनाने आनंदवनच्या ग्रामपंचायतीत त्याला बाहेर काढण्याचा ठराव मंजूर करवून घेतला. असा नियमबाह्य़ ठराव करणारी ही देशातील एकमेव पंचायत असावी. आरोपाच्या चौकशीसाठी समिती गठित करा, असा राजूचा आग्रह; पण व्यवस्थापनाने अजूनही ती गठित केली नाही. दुसरीकडे राजूला धमकावणे सुरूच. टाळेबंदीच्या काळात राजूच्या घराची वीज तोडण्यात आली. पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्याला दूध मिळू दिले नाही. या अन्यायाचे चित्रीकरण आजही समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. राजूने विकास आमटेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. प्रकाश आमटेंची दोनदा भेट घेतली. त्यांनी मध्यस्थी केली, पण व्यवस्थापनाने ऐकले नाही. त्याने विश्वस्तांना पत्रे लिहिली, पण कुणीही त्याची दखल घेतली नाही. अखेर एक दिवस सुरक्षारक्षकांच्या गराडय़ात राजूला कुटुंबासकट घराबाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. त्याला घर रिकामे करण्याची नोटीस वारंवार देण्यात आली. त्याचे वेतन थांबवण्यात आले. यामुळे चिडलेल्या राजूने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. आता चौकशी सुरू असली तरी या प्रकरणाने आनंदवनाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. ‘मी कौस्तुभचा माणूस म्हणून माझा छळ सुरू आहे,’ असे राजूने सांगितले. स्वत: कौस्तुभ यांनी मात्र राजूच्या चांगुलपणाची पावती देताना ‘तो माझा नाही, संस्थेचा माणूस आहे, कार्यकर्ता आहे,’ असे उत्तर दिले. डॉ. शीतल करजगी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले. राजूने केलेल्या गैरव्यवहारांची जंत्री आपल्याकडे आहे, त्याला अजून घराबाहेर काढले नाही, असे शीतल यांनी स्पष्ट केले. राजूच्या पत्राला दिलेल्या उत्तरात संस्थेला माहिती अधिकार कायदा लागू नाही, असे नमूद करणाऱ्या शीतल करजगी यांनी यासंदर्भात पाठवलेल्या प्रश्नावलीतील मुद्दय़ाला उत्तर देणे टाळले. डॉ. विकास आमटे यांनीसुद्धा, ‘राजूने पुष्कळ घोळ करून ठेवले आहेत,’ असे सांगितले. घोळ कोणते, असे विचारले असता दोघांनीही सांगितले नाही.

पोलीस तक्रार झाल्याने राजूचे प्रकरण चव्हाटय़ावर आले; पण अशी बरीच प्रकरणे आनंदवनात घडू लागली आहेत. विजय जुमडे हेही येथील एक कार्यकर्ते. त्यांच्या मुलाला तेथील कृषी महाविद्यालयात नोकरी मिळाली. त्यानंतर व्यवस्थापनाने त्यांचे कमी असलेले घरभाडे वाढवण्यासाठी तगादा सुरू केला. जुमडे कार्यकर्ता पदावरून निवृत्त झाल्याने त्यांनी यास नकार दिला, मग सुरू झाली छळणूक. जुमडेंच्या मुलाला मिळणाऱ्या शासकीय वेतनातून परस्पर अधिकचे पैसे कापून घेणे सुरू झाले. त्याला पावती मात्र संस्थेला स्वेच्छेने देणगी दिली, अशी देण्यात आली. याविरुद्ध आवाज उठवला तर मुलाला नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात शीतल करजगींना प्रश्नावली पाठवली; पण त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. समाजाने टाकून दिलेल्यांसाठी माहेरघर असलेली ही संस्था टिकायला हवी, यावर साऱ्यांचेच एकमत आहे; पण नव्या व्यवस्थापनाच्या मनमानीला लगाम कुणी घालायचा यावर कुणीच बोलत नाही. आनंदवनातल्या छळकथा ऐकून राज्यभरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते अस्वस्थ झालेले दिसतात. ते तसे बोलूनही दाखवतात; पण ही संस्था टिकावी म्हणून पुढाकार घेताना कुणी दिसत नाही.

कुष्ठरुग्णांना प्रवेशबंद

ज्या कुष्ठरुग्णांसाठी ही वसाहत निर्माण झाली, त्यांनाच आता आनंदवनने प्रवेश नाकारणे सुरू केले आहे आणि ज्यांना प्रवेश दिला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे सुरू केले आहे. त्यामुळे ‘कार्पोरेट’च्या वळणावर असलेल्या या संस्थेच्या उद्दिष्टालाच तडे जायला सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रसजवळच्या कलगावचा संतोष गव्हाणे सध्या दिल्लीच्या निर्मला रुग्णालयात कुष्ठरोगावर उपचार घेत आहे. आधी तो आनंदवनात होता. काही दिवस उपचार केल्यावर त्याला सोडून जाण्यास सांगण्यात आले. त्याने नकार दिला. मग त्याचा छळ सुरू झाला. ‘आनंदवनात आता आम्हाला कुष्ठरोग्यांची गरज नाही, येथे आता धडधाकट लोकांची आवश्यकता आहे’, असे संतोषला तोंडावर सुनावण्यात आले. या प्रकरणाची तक्रार संतोषने जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले; पण पुढे काही झाले नाही. शेवटी त्याला जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. आता तो नाइलाजाने एक हजार किलोमीटरवर असलेल्या दिल्लीत उपचार घेत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात आनंदवनच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इरादा त्याने व्यक्त केला.

नागपूर जिल्ह्य़ातील मौद्याच्या गोपाळ नंदरधने या कुष्ठरुग्णालासुद्धा याच पद्धतीने हाकलून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपुरातील दीपक कार्लेकर या कुष्ठरुग्णाला करोनाचे कारण देत आनंदवनात प्रवेश नाकारण्यात आला. हाच प्रकार अकोल्याचे निवास खोलगडे यांच्यासंदर्भातही घडला. नंतर त्यांच्या नातेवाईकांनी थेट शीतल करजगींना दूरध्वनी केल्यावर प्रवेश देण्याचे मान्य करण्यात आले. हे सारे प्रकार बघून आनंदवन हे कुष्ठरुग्णांचे हक्काचे घर आहे, या समजुतीलाच तडा गेला आहे. यासंदर्भात शीतल यांना पाठवलेल्या प्रश्नावलीला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर असलेल्या एका जाणकार व्यक्तीने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिलेली माहिती धक्कादायक आहे. संस्थेचा कारभार याच पद्धतीने सुरू राहिला तर त्यावर प्रशासक नियुक्त करण्याची वेळ लवकर येईल. तसे करण्यासाठी लागणारी सर्व कारणे येथे आहेत, असे ते म्हणाले. शीतल करजगी यांनी विश्वस्त मंडळावर दबाव आणून स्वत:ची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करवून घेतली. यासाठी त्यांना एक लाख रुपये पगार मिळतो. बाबांनी ही संस्था उभारताना कायम सेवाभाव जोपासला. त्यामुळे त्यांचे मानधन शेवटपर्यंत २०० रुपयेच होते. डॉ. विकास आमटेंनी अतिशय अल्प मानधनावर काम करायला सुरुवात केली. ते डॉक्टर असल्यामुळे नंतर त्यांचे मानधन २५ हजारांपर्यंत पोहोचले. आनंदवन ही सार्वजनिक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या घटनेत ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ असे पद नमूद नाही; पण तो संकेत झुगारून शीतल करजगींची नेमणूक झाली, असे या विश्वस्तांनी सांगितले. अर्थात हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

डॉ. शीतल आणि गौतम करजगी यांनी संस्थेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आर्थिक व्यवहारही ताब्यात घेतले. आता आनंदवनाचे प्रशासन, आर्थिक अधिकार, नियोजन आणि धोरण ठरवण्याची सारी सूत्रे शीतल आणि गौतम यांच्याकडे गेली आहेत. यापैकी कुणालाही बाबांची दृष्टी नसल्यामुळे आणि इतरांचे ऐकून घेणे, मदत घेणे हे प्रकार पूर्णपणे बंद केल्याने संस्थेचा कारभार स्थितीवादी झाला असून त्याला उतरती कळा येऊ लागली आहे. एके काळी साऱ्या देशभर गौरव झालेल्या या संस्थेची अशी अवस्था बघून बाबांवर श्रद्धा ठेवणारे असंख्य कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. डॉ. शीतल यांना हे सारे आरोप अमान्य आहेत. संस्थेत ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ असे पद निर्माण करू नये असे कुठेही नमूद नाही. कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला. संस्थेने प्रत्येकालाच चांगले वेतन देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे वेतन १ लाख नाही, तर ७५ हजार रुपये आहे आणि कौस्तुभचे ६० हजार असा उल्लेख त्यांनी मुद्दाम केला. काळानुरूप मानधन वाढले. त्यामुळे आता बाबांच्या मानधनाशी तुलना योग्य नाही, अशी पुष्टीही शीतल यांनी जोडली.

डॉ. विकास आणि प्रकाश आमटेंनासुद्धा असे पद निर्माण करण्यात काही गैर आहे, असे वाटत नाही. संस्थेच्या संचालनावरून आमटे कुटुंबात मतभेद असल्याचा इन्कार या तिघांनीही केला. कुष्ठरुग्णांना दाखल करून न घेणे यासारख्या प्रश्नावलीतील महत्त्वाच्या मुद्दय़ावर शीतल बोलण्यास तयार नाहीत. त्याची दखलही त्या घेत नाहीत. ही संस्था टिकणे, ही काळाची गरज आहे, याच्याशी केवळ आमटेच नाही तर संस्थेवर प्रेम करणारे सारेच सहमत असतात; पण छळवादाच्या मुद्दय़ावर पुढाकार घ्यायला कुणी धजावत नाही.

*नेत्रशस्त्रक्रिया शिबिरासह अनेक आरोग्य शिबिरांवर गदा

*कार्यकर्त्यांवर आरोप, धमक्या, घराबाहेर काढण्याचा प्रयत्न

*कार्यकर्त्यांच्या शासकीय वेतनातून परस्पर बेकायदा कपात

*अस्वस्थ ‘कर्तेधर्ते’ आनंदवन सोडून जाण्याच्या मन:स्थितीत

*कार्पोरेट’ करण्याच्या नादात संस्थेच्या उद्दिष्टालाच हरताळ

*घटनेत नसलेल्या ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ पदाची निर्मिती