करोनाचा संसर्ग आणि उपचारांदरम्यान वेळेत अँम्ब्युलन्स उपलब्ध होऊ न शकल्याने पुण्यात पत्रकार पाडुंरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणाची चौकशी करु असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मुंबईत ते पत्रकारांनी बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, “या घटनेमध्ये वेळेत अॅब्युलन्स न मिळणे हे दुर्देवी आहे, याचं समर्थन होऊ शकत नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक आदेश देण्यात आले आहेत की, कुठल्याही परिस्थितीत आपण अँब्युलन्स भाड्याने घ्या आणि रुग्णांना मोफत योग्य संख्येने सुविधा पुरवा. मात्र, तरीही अशा घटना घडणं हे निषेधार्ह आहे. या प्रकरणाची चौकशी करू आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याची योग्य ती काळजी घेऊ”

आणखी वाचा- श्रीमंत लोक लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात – राजेश टोपे

कोविड काळात काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जात आहे. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना विम्याची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासनही यावेळी टोपे यांनी दिले आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष दिले असून जम्बो रुग्णालयं बनवली आहेत. तिथं अजून व्यवस्था तयार होत आहेत. बेडची अडचण येऊ नये म्हणून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही टोपे म्हणाले.