रुग्णालय संमत आवरणातील करोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहापासून कसलाच धोका नसल्याचे स्पष्ट करण्यासाठी येथील डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी अशा मृतदेहास स्पर्श करू देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज शुक्रवारी केली. करोनाबाधित रुग्णाच्या वेष्टणातील मृतदेहाला स्पर्शसुद्धा करण्याचे नाकारणाऱ्या नातेवाईकांची उदाहरणे मोठय़ा प्रमाणात पुढे येत आहे. हा असा गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: प्रात्यक्षिक देण्याचे डॉ. खांडेकर यांचे पाऊल अभिनंदनीय ठरत आहे.

कोविड-१९ची चाचणी प्रयोगशाळा असणाऱ्या सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयात न्याय वैद्यकशास्त्र विभागात कार्यरत डॉ. खांडेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलांसाठी यशस्वी प्रयत्न केले आहे. डॉक्टरांचे हस्ताक्षर, शवविच्छेदन अहवाल, एमबीबीएसच्या अभ्यासक्रमातील बदल व अन्य स्वरूपात सुधारणा करण्यात डॉ. खांडेकर यांचे योगदान राहिले आहे. माहिती अधिकार कायद्यातून त्यांनी अनेक त्रुटी निदर्शनास आणून जनहित याचिकांच्या माध्यमातून त्या दूर केल्या. आता करोना साथीतही मृतदेहाची विटंबना होत असल्याबद्दल त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा दाखला देत विटंबना टाळण्याचे उपाय सुचवले. तसेच करोना साथीवरील लसीच्या शोधाबाबत पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष वेधले आहे.

सध्या करोनाबाधित मृतदेहाची विटंबना होत असल्याची उदाहरणे पुढे येत आहे. संक्रमित मृतदेहाचे अंत्यसंस्कार रोखण्याच्या घटना देशभरात घडत आहेत. अनाठायी भीतीपोटी नातेवाईक रुग्णालयाने शासकीय नियमानुसार योग्य आवरणात बांधून दिलेल्या मृतदेहाला स्पर्श करण्याचे टाळतात. मृतदेह रुग्णवाहिकेत हलवताना किंवा अंत्यसंस्कारावेळी चितेवर ठेवताना तसेच दफ न करताना स्पर्श करण्याचे नाकारत आहे. त्यामुळे रुग्णालयीन कर्मचारी किंवा पोलिसांना ही कामे करावी लागत असल्याचे डॉ. खांडेकर यांनी शासनाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले.

मृत शरीराच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या या घटना आहे. मृत व्यक्तीच्या नातलगाकडूनही अमानुष प्रकारे मृतदेह हाताळल्या जात आहे. शासनाने काही ठिकाणी संक्रमित मृतदेह स्मशानभूमीत हाताळण्यासाठी पीपीई घातलेले परिचारक नियुक्त केले आहे. त्यामुळेसुद्धा मृतदेहापासून खूप धोका असल्याचा चुकीचा संदेश समाजात जात आहे. रुग्णालयाने योग्यरितीने पॅक केलेल्या मृतदेहाला हाताळण्यासाठी पीपीईचीसुद्धा गरज नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. फ क्त मृतदेहाशी थेट संपर्क नको व त्याचे चुंबन आदी स्पर्श नको, हेच जनतेला माहीत होणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण स्वत: पीपीईविना नियमबद्ध मृतदेहास स्पर्श करून दाखवण्यास तयार आहोत, त्यास परवानगी मिळावी, असे आवाहन या पत्रातून डॉ. खांडेकर यांनी केले आहे. डॉ. खांडेकर न्याय वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ असून विविध प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित असलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना त्यांचा वारंवार संपर्क होतो. याच पाश्र्वभूमीवर नागरिकांची भीती दूर करण्यासाठी त्यांनी स्वत: पुढे येण्याचे ठरवले.