“हिंदू समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्या शरजील उस्मानीवर चाप बसवण्यासाठी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, ही खात्री असल्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी पत्र लिहून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या ट्विटसोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेलं पत्र देखील जोडलं आहे.

चंद्रकांत पाटील या पत्रात म्हणतात, “अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानीने ३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे एल्गार परिषदेच्या एका कार्यक्रमात हिंदू समाजाबद्दल अत्यंत अपमानजनक वक्तव्य केलं आहे, जसं की ”आजचा हिंदू समजा सडला आहे..” याचबरोबर त्याने अन्य अनेक वक्तव्य केली आहेत, ज्या मागे समाजात द्वेष निर्माण करण्याच्या हेतू होता. पंतप्रधान मोदी आणि देशाच्या घटनात्मक संस्थांविरुद्ध अशा प्रकारची भाषा वापरणं राष्ट्रद्रोहा पेक्षा कमी नाही. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हिंदू समजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.”

“शरजील उस्मानी उत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्ह्याच्या सिधारी भागातील मूळ रहिवासी आहे. त्याने केलेल्या वक्तव्यास पाच दिवस झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार या विरोधात कुठलीही कारवाई करणार नाही, हे राज्यातील कोट्यावधी जनतेला माहिती झाले आहे. राज्यातील जनता दुःखी व अत्यंत संतप्त झालेली आहे.”

शरजील उस्मानी एल्गार परिषदेत काय म्हणाला? वाचा संपूर्ण भाषण…

“आपणास विनंती आहे की, शरजील उस्मानीच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांना लवकरात लवकर एफआयआर नोंदवण्यासाठी आणि त्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश द्यावेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हिंदुंच्या भावनाना ठेच पोहचवणाऱ्या व्यक्ती विरोधात कठोरातील कठोर कारवाई केली गेली पाहिजे आणि या केसचे एक उदाहरण सर्व देशासमोर निर्माण झाले पाहिजे. जेणेकरून कुणी अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करण्याची हिंमत करणार नाही. जय हिंद !”

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला अनेक मान्यवरांसह विद्यार्थी नेता शरजील उस्मानीही सहभागी झाला होता. यावेळी शरजील उस्मानी याचं भाषण झालं. या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासही पोलिसांकडून सुरू आहे.