मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दिलेल्या मुदतीत बुजवण्यात महामार्ग प्राधिकरणाला अपयश आल्यानंतर आता महामार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला साकडे घालण्यात आले आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन ही विनंती केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ६ ऑगस्टला एक बठक घेण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर महामार्गाला पडलेले खड्डे २० ऑगस्टपूर्वी भरण्याच्या सूचना या वेळी महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आल्या होत्या. मात्र बांधकाममंत्र्यांच्या या सूचनेला महामार्ग प्राधिकरणाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गेल्या १८ दिवसांत वडखळ परिसरातील काही भाग वगळता महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही कार्यवाही केली नाही. पालकमंत्री सचिन अहिर, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे आदेशही महामार्ग प्राधिकरणाने धुडकावले आहेत. त्यामुळे आता महामार्गाचे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला साकडे घालण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. गणेशोत्सव आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने मुंबईतील चाकरमानी कोकणात दाखल होणार आहे. सुमारे ७० हजार छोटी वाहने, तर २० हजार खासगी आणि एसटीच्या बसेस कोकणात दाखल होणार आहेत. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता राज्याच्या सार्वजनिक विभागाला महामार्गावरील खड्डे बुजवण्याची विनंती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी बांधकाम सचिवांना केली आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी ६ ऑगस्टला घेतलेल्या बठकीत १९ ऑगस्टपूर्वी महामार्गावरील खड्डे न भरल्यास, रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाईल आणि यासाठी केलेला खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केला जाईल, असेही स्पष्ट केले होत. त्यानुसार बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे, अशी विनंती जिल्हाधिकारी भांगे यांनी केली आहे.