|| नीरज राऊत

अवैध रेती उत्खननामुळे किनाऱ्याची झपाटय़ाने झीज सुरू; ग्रामस्थांचे महसूल मंत्र्यांना पत्र

पालघर : सफाळा व वैतरणा रेल्वे स्थानकांच्या मध्यभागी असलेल्या वाढीव बेटाचा किनारा फोडून त्याखाली दडलेल्या रेतीचे गैरमार्गाने उत्खनन होत आहे. त्यामुळे संपूर्ण वाढीव बेटाला तसेच वैतरणा नदीवरील दोन रेल्वे पुलांना धोका निर्माण झाला आहे. अवैध रेती उत्खनन बंद करण्यासाठी शासनाने ठोस पावले न उचलल्यास वाढीव बेट नकाशावरून नामशेष होण्याची भीती येथील ग्रामस्थांनी महसूलमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

पश्चिम रेल्वेवरील सफाळे आणि वैतरणा या रेल्वे स्थानकांच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटाला वैतरणा नदीने सभोवती वेढले आहे. सुमारे १० ते १२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या बेटाचा किनारा फोडून त्याखाली असलेल्या रेतीचे उत्खनन गेल्या काही वर्षांपासून गैरमार्गाने सुरू आहे. अशा उत्खननावर स्थानिक गावकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार व पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून या तक्रारींवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावांमध्ये पंधरा विहिरी व वीस कूपनलिका असून वाढीव- वैतीपाडा येथील बहुतांश नागरिक हे नोकरीनिमित्ताने गावाबाहेर जात असतात. वैतरणा नदीतील रेतीचा साठा कमी झाल्याने तसेच नदीच्या पात्राची खोली वाढल्याने हातपाटीने रेतीचा उपसा करणे गेल्या अनेक वर्षांपासून अशक्य झाले आहे. तसेच नदीचे पात्र अतिखोल झाल्याने सक्शन पंपद्वारेदेखील रेती उत्खनन करणे शक्य नसल्याने रेतीमाफियांनी वाढीव बंदराच्या किनाऱ्यावर मातीखाली असलेल्या रेतीवर आपले लक्ष केंद्रित केले होते.

या गैरमार्गाने रेती उत्खनन करणाऱ्या मंडळींमध्ये गावातील काही नागरिकांचा समावेश असून यापूर्वी गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने रेतीमाफियांनी काही ग्रामस्थांना दमदाटी केल्याचे प्रकार घडले होते. वैतीपाडय़ाच्या नवघर (उत्तर बाजूस) आणि डोलीव (दक्षिण बाजूस) बेसुमार पद्धतीने किनारा फोडण्याचे काम सुरू असून यामुळे सुमारे निम्म्या विहिरी व कूपनलिकांचे पाणी मचूळ झाले आहे. त्याचप्रमाणे या बेटाचे दोनशे एकर क्षेत्र या अनधिकृत रेती व्यावसायिकांनी फोडल्याने नष्ट झाले असून गावातील निम्म्या शेतीच्या भागांमध्ये उधाणाचे खारे पाणी शिरत असल्याने ही जमीन शेतीस योग्य राहिली नाही. या बेटामध्ये खाडीचे पाणी शिरू नये म्हणून बांधलेल्या खारलॅण्ड बंधाऱ्यांना भगदाड पडले असून त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अनेकदा मोठी कसरत करून प्रवास करावा लागतो. त्याचप्रमाणे वाढीव वैतीपाडामध्ये नव्याने बांधलेल्या काही घरांमध्ये उधाणाचे पाणी शिरत असल्याचे दिसून आले आहे.

नैसर्गिक कवच संपुष्टातगैरमार्गाने सुरू असलेल्या रेती उत्खननामुळे वाढीव बेटाच्या किनारी असलेल्या तिवरांची पडझड झाली असून यामुळे खाडीच्या पाण्यापासून या बेटाला असलेले नैसर्गिक सुरक्षा कवच संपुष्टात आले आहे. या सर्व प्रकारामुळे बेटाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून ३ ऑगस्ट २०१९ रोजी या भागात आलेल्या महापुरात बेटावरील प्रवाह पूर्वीच्या तुलनेत अत्यंत वेगात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. वैतरणा नदीच्या पात्रात रेल्वे पुलांपासून दोन्ही बाजूला ६०० मीटपर्यंत कोणत्याही प्रकारच्या उत्खननास बंदी आहे. तसेच संपूर्ण खाडीपात्रात ड्रेसिंग करण्यास हरित लवादाकडून र्निबध लादण्यात आले आहेत. असे असताना रेती व्यावसायिकांनी काही अधिकारी वर्गाला हाताशी धरून वाढीवसारखे एक सुपीक बेट नष्ट करण्याचा घाट घातला असल्याचे ग्रामस्थांनी महसूलमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कारवाई नाहीच

या बेटावर पोहोचण्यास शासकीय यंत्रणेला मर्यादा येत असल्याने कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना या ठिकाणी राजरोसपणे रेती उत्खनन सुरू असल्याकडे ग्रामस्थांनी पालघर जिल्हाधिकारी यांचेदेखील निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या प्रकरणी महसूल विभागाने तसेच पोलीस विभागाने गैरमार्गाने रेती उत्खनन करणाऱ्यांच्याविरुद्ध सातत्यपूर्ण कारवाई करणे गरजेचे झाले असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.