ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

चंद्रपूर : येस बँकेशी  संलग्नित चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आनंद नागरी बँक, भंडारा अर्बन, अकोला अर्बन या बँकांचे धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) व नॅशनल इन्शुरन्सने स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  हे निर्देश वरिष्ठ कार्यालयातून आल्याचे येथे सांगण्यात आले.  दरम्यान, या सर्व बँकांचे धनादेश क्लिअरिंग, आरटीजीएस आदी सेवा दोन दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ व नॅशनल इन्शुरन्स यासह इतरही विमा कंपन्यांनी सहकारी बँकांचे धनादेश स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे एलआयसी व अन्य विमा कंपन्यांनी मागील दोन दिवसांपासून कार्यालयात ग्राहकांचे जमा झालेले धनादेश परत केले आहेत. तसेच ग्राहकांनी या बँकांचे धनादेश देवू नयेत, असेही बजावले आहे.  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक एस.एन. दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पासून बँकेचे धनादेश क्लिअरिंग, आरटीजीएस व  इतर सर्व सेवा बंद आहेत. एलआयसीचे लेखा विभागाचे अधिकारी रामअवतार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, वरिष्ठ कार्यालयाकडून या बँकांचे धनादेश स्वीकारू नयेत असे स्पष्ट आदेश आले आहेत.

येस बँकेवर निर्बंध येताच जिल्हय़ातील अनेक बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या सर्व बँकांच्या प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शनिवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीत बँकांचे व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रपूर जिल्हा बँकेचे येस बँकेत १० कोटी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे येस बँकेत १० कोटी जमा आहेत. तसेच या बँकेसोबत इतरही व्यवहार असल्याची माहिती व्यवस्थापक दुबे यांनी दिली. बँकेचे सर्व व्यवहार ठप्प असले तरी सोमवार पर्यंत व्यवहार सुरळीत होतील असे त्यांनी सांगितले.