अलिबाग सत्र न्यायालयाचा निर्णय
पत्नी व मुलीचा अमानुषपणे खून करणाऱ्या पेण तालुक्यातील उमेश पाटील यास अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पेण तालुक्यातील वाशी येथील प्रदीप विलास म्हात्रे यांची मुलगी चताली हिचा प्रेमविवाह त्याच गावातील उमेश गणेश पाटील याच्यासोबत झाला होता.
पाटील दाम्पत्याला आर्या नावाची मुलगीही होती. उमेश कोणताही कामधंदा करत नसल्याने दोघांमध्ये वाद होत असे. तो पत्नी चताली हिला मारहाण करीत असे. तंटामुक्त गाव समितीनेही यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला; परंतु उमेशने चतालीला मारहाण करणे सुरूच ठेवले. चतालीचे सासू-सासरेदेखील तिला त्रास देत होते. उमेशच्या एका मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणावरून चताली आणि उमेशमध्ये खटके उडत.
२८ फेब्रुवारी २०१३ रोजी चताली आपल्या मुलीला घेऊन माहेरहून जगदंबावाडी येथे आली होती. त्याच रात्री चताली व उमेशमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
उमेशने रागाच्या भरात पत्नी चताली व मुलगी आर्या यांचा गळा दाबून खून केला व त्यांना जाळून टाकले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी उमेश पाटील, गणेश पाटील, शालिनी पाटील या तिघांना अटक केली. त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्याची सुनावणी अलिबाग येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले. पत्नी चताली व मुलगी आर्या या दोघांचा खून केल्याप्रकरणी उमेश पाटील यास न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.