एड्सग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या ‘आम्हीच आमचे’ या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष विद्या कदम या तरुणीच्या खूनप्रकरणी तिच्या दोन दिरांना न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
विद्या कदम यांचा कळंबी (ता. मिरज) येथे १७ जानेवारी २००९ रोजी जमीन व घर जागेच्या कारणावरून खून करण्यात आला होता. या प्रकरणी शंकर सुखदेव कदम व चिम्या ऊर्फ विश्वास सुखदेव कदम या दोघांना सत्र न्यायाधीश डी. जी. धुमाळ यांनी जन्मठेप व २ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली.
विद्या कदम यांचा विवाह आरोपीचा भाऊ राजेंद्र कदम याच्याशी झाला होता. मात्र तत्पूर्वी त्याला एड्सची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. हे माहीत असूनही त्याचे विद्याशी लग्न करण्यात आले, मात्र विद्याचा पती राजेंद्र याचा मृत्यू झाल्यानंतर जमीन व घर जागेच्या कारणातून आरोपींनी तिचा खून केला होता.