सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव बजरंग धावणे (४५, रा. बाळे, सोलापूर) यांचा चार लाखांची सुपारी देऊन खून केल्याच्या आरोपावरून पंढरीनाथ पवार (४०, रा. यशवंत सोसायटी, सोलापूर) याच्यासह पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
पंढरीनाथ पवार याच्यासह प्रकाश ऊर्फ बुद्धा रामचंद्र शिंदे (२५, रा. उत्कर्षनगर, सोलापूर), सोन्या मेटकरी (रा. विजापूर नाका झोपडपट्टी क्र. २, सोलापूर), गहिनीनाथ गोवर्धन धावणे (४६, रा. बाळे, सोलापूर) व प्रशांत पांडुरंग सावंत (४२, रा. मुरारजी पेठ, सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सहावा आरोपी अमर माने (रा. स्वागतनगर, सोलापूर) याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मृत बजरंग धावणे हे १६ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी आपला मुलगा स्वप्नील याच्यासोबत मोटारसायकलवरून डिकसळ या मूळ गावाकडे निघाले असता वाटेत पडसाळी ते मसले चौधरी गावादरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी धावणे यांना थांबवून, तुम्ही सोलापूरचे धावणे का, असे विचारले. धावणे यांनी हो म्हणताच त्या दोघा तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता धारधार शस्त्रांनी धावणे यांच्या छाती, खांदा व दंडावर सपासप वार केले. धावणे हे रक्ताच्या थारोळय़ात पडताच दोघे मारेकरी पल्सर मोटारसायकलवरून पळून गेले. या घटनेने मुलगा स्वप्नील भांबावला. नंतर धावणे यांना उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. मोहोळ पोलिसांनी या गुन्हय़ाचा तपास हाती घेतला असता सुरुवातीला दोन दिवस हा गुन्हा कोणी केला, याचा थांगपत्ता लागला नव्हता. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केलेल्या तपासात शिक्षक, शिक्षकेतर सेवक पतसंस्थेत भांडणे होत असल्याची माहिती मिळाली. पतसंस्थेत सेवेत असलेल्या पंढरीनाथ पवार व गहिनीनाथ धावणे हे दोघे सचिवपदासाठी भांडत होते. याच सुमारास पतसंस्थेने सोलापुरात खरेदी केलेल्या भूखंड व्यवहारात तसेच लाभांश व कर्जवाटपात भ्रष्टाचार झाल्याचा वादही गाजत होता. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी पंढरीनाथ पवार यास घटनेच्या दरम्यान फोनवरून झालेला संपर्क तपासला असता त्यात मारेकऱ्यांचा संपर्क झाल्याचे दिसून आले. त्यावरून पंढरीनाथ पवार यास सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली. नंतर या गुन्हय़ाची उकल होऊन बजरंग धावणे यांचा खून करण्यासाठी पवार याच्यासह गहिनीनाथ धावणे व प्रशांत सावंत यांनी प्रकाश शिंदे व सोन्या मेटकरी यांना चार लाखांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.
या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी सरकारतर्फे १२ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी स्वप्नील धावणे, पोलीस तपास अधिकारी श्रीकांत पाडुळे यांच्यासह आरोपींच्या मोबाइल कॉल डिटेल्सची माहिती देणारे नोडल अधिकारी चेतन पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीतर्फे अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. भारत कट्टे, अ‍ॅड. पी. जी. देशमुख यांनी काम पाहिले.