किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकाचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल तीन भावांसह पाच जणांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम वसूल झाल्यास त्यातून २५ हजारांची रक्कम मृताच्या आईला तर १५ हजारांची रक्कम विधवा पत्नीला देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सोलापूर शहराजवळील घोडातांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथे २७ मे २०१२ रोजी सकाळी झालेल्या खूनखटल्यात राजू अर्जुन चव्हाण (२४), त्याचे भाऊ, संतोष चव्हाण (२३) व शिवाजी चव्हाण (२६) यांच्यासह रवि थावरू राठोड (२०) व दीपक रामहरि चव्हाण (२४) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना व्होरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. शुक्रवारी सायंकाळी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी २० हजारांची दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, की २६ मे २०१२ रोजी घोडा तांडा येथे क्रिकेट खेळताना त्यांच्यात भांडण झाले होते. त्या वेळी आरोपी राजू चव्हाण याने रागाच्या भरात एका लहान मुलाला मारहाण केली होती. त्याचा जाब मृत विलास रामू चव्हाण (३०, रा. घोडातांडा) याने विचारला असता त्या दोघांत भांडण होऊन राजू याने त्यास शिवीगाळ करीत खुनाची धमकी दिली होती. नंतर घरी जाऊन त्याने चाकू आणला व मृत विलास याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सोबत इतर आरोपी होते. मात्र परिसरातील जबाबदार मंडळींनी हे भांडण मिटविले खरे, परंतु आरोपी चव्हाण बंधू हे मृत विलास याच्यावर चिडून होते. दुसऱ्या दिवशी मृत विलास चव्हाण हा आपली रिक्षा घेऊन व्यवसायासाठी घरातून ५० हजारांची रोकड घेऊन निघाला असता आरोपी राजू चव्हाण व इतरांनी वाटेत मजरेवाडी येथे त्यास रस्त्यावर अडविले. तेव्हा हल्ल्याच्या भीतीने रिक्षा सोडून विलास याने पलायन केले असता आरोपींनी पाठलाग करून त्यास पकडले व त्यांच्यावर चाकू व इतर शस्त्रांनी सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी मृताचा भाऊ विकास चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. माधुरी देशपांडे यांनी अकरा साक्षीदार तपासले. यात छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. संतोष भोई यांच्यासह घटनेच्या प्रत्यक्ष नेत्र साक्षीदार पुलाबाई राठोड आदींची साक्ष महत्त्वाची ठरली. मूळ फिर्यादीतर्फे माजी जिल्हा सरकारी वकील अब्बास काझी व अ‍ॅड. अहमद काझी यांनी काम पाहिले, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. रोहिदास पवार यांनी बाजू मांडली.