संपत्तीच्या वादातून सासुरवाडीला जाऊन पत्नी आणि सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी शिवाजी साहेबराव मडके (रा. मोहा. ता. कळंब) यास मरेपर्यंत जन्मठेप आणि ५ हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी हा निकाल दिला.

जानेवारी २०१३ मध्ये हे क्रूर हत्याकांड घडले.  अतिरिक्त अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. कळंब तालुक्यातील मोहा या ठिकाणी शिवाजी मडके याची सासुरवाडी उस्मानाबाद येथील ढोकी या ठिकाणी आहे. २२ जानेवारीला शिवाजी हा ढोकी येथे आला. त्याच्या दोन मुली अंगणात खेळत होत्या त्यावेळी त्याने मुलींना आई कुठे आहे म्हणून विचारले? त्यावेळी त्याचे सासरे लिंबराज कंगले बाहेर आले. दोघे बोलत असताना शिवाजीची पत्नी सुरेखाही बाहेर आली.

त्यावेळी शिवाजीने पत्नी सुरेखा हिच्याकडे शेत जमिनीची कागदपत्रे आणि पैशांची मागणी केली. त्यावेळी शेती विकल्यास व पैसे दिल्यास मुलांच्या भवितव्याचे काय? असे म्हणताच शिवाजीने पत्नी सुरेखा हिला शिवीगाळ केली. घराचे मुख्य दार आतून लावून घेत त्याने सोबत पिशवीमध्ये आणलेला चाकू बाहेर काढला. तेव्हा सासरे लिंबराज यांनी जावई शिवाजीच्या हातातील चाकू हिसकावून घेऊन फेकून दिला. त्यामुळे शिवाजी याने अंगणात पडलेला खोऱ्या सासरे लिंबराज यांच्या डोक्यात हाणला. या हल्ल्यात ते जखमी झाले. वडिलांना वाचविण्यासाठी सुरेखा मध्ये आली असता शिवाजी याने अंगणात पडलेला चाकू उचलून सुरेखा हिच्या पोटावर व हातावर सपासप वार केले. पत्नी जमिनीवर कोसळल्यानंतर त्याने सासरा लिंबराज यांच्यावर चाकूने हल्ला करून छातीवर वार केले.

हा रक्तरंजित थरार पाहून शिवाजी याच्या दोन्ही अल्पवयीन मुली प्रचंड भेदरल्या. वडिलांचे सैतानी रूप पाहून त्यांनी घराचे दार उघडून पळ काढला. दरम्यान हा गोंधळ ऐकून घराबाहेर शेजाऱ्यांची गर्दी जमली. गावकऱ्यांनी शिवाजी याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गुन्ह्यात वापरलेला चाकू व खोऱ्या तिथेच टाकत लोकांवर दगडफेक करून तो पळून गेला. ग्रामस्थांनी गंभीर जखमी अवस्थेत लिंबराज व सुरेखा यांना ढोकी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी दोघांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी ढोकी येथील राजेंद्र गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. आरोपीच्या दोन्ही मुलींनी पित्याच्या कृत्याची दिलेली साक्ष महत्वपूर्ण ठरली.