20 November 2017

News Flash

डॉ़ जयंत नारळीकर, ठाकूरदास बंग यांना जीवन गौरव

ज्येष्ठ सर्वोदयी नेते ठाकूरदास बंग आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची महाराष्ट्र फाऊंडेशन

प्रतिनिधी, नाशिक | Updated: December 18, 2012 5:17 AM

ज्येष्ठ सर्वोदयी नेते ठाकूरदास बंग आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच समाजकार्याबद्दल शिवाजी कागणीकर, माधव बावगे, बाळकृष्ण रेणके यांना तर साहित्य ग्रंथासाठी करूणा गोखले, लिला आवटे, आनंद विंगकर, नीरजा तसेच नाटकांसाठी जयंत पवार यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
या पुरस्कारांचे संयोजन साधना ट्रस्टतर्फे केले जाते. ट्रस्टचे समन्वयक महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत कावळेयांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये व सन्मानचिन्ह, समाजकार्य कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये व सन्मानचिन्ह आणि साहित्य क्षेत्रातील सर्व पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रूपये व सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कार प्रदान सोहळा पाच जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील साने गुरूजी स्मारकात ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर व प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
समाजकार्याबद्दल जीवन गौरव जाहीर झालेले ठाकूरदास बंग यांना महात्मा गांधी यांचे सान्निध्य लाभले आहे. त्यांनी जीवनदानी कार्यकर्ते म्हणून विनोबांचे भूदान आंदोलन तसेच जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात काम केले. ४० वर्षांपासून विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी झटणारे व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान विषयावर विपूल लेखन करणारे जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय समाजकार्य पुरस्कारांत भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणारे सोलापूरचे बाळकृष्ण रेणके, मराठवाडय़ात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात दोन दशकांपासून सक्रिय असणारे लातूरचे माधव बावगे, बेळगाव जिल्ह्यात असंघटीत कष्टकरी वर्गासाठी रचनात्मक काम करणारे शिवाजी कागणीकर यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. साहित्य पुरस्कारात ‘बाईमाणूस’ या वैचारिक ग्रंथाबद्दल करूणा गोखले, ‘जाग मना जाग’ या पुस्तकाबद्दल लिला आवटे यांना अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार तर ललित विभागात आनंद विंगकर यांना ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ आणि नीरजा यांना ‘निर्थकाचे पक्षी’ या पुस्तकाबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे.
रा. शं. दातार नाटय़ पुरस्कार जयंत पवार यांना ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाबद्दल जाहीर झाला आहे. विविध पुरस्कारांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून मोहन धारिया, विजया चौहान, रा. ग. जाधव, माधव वझे यांनी काम पाहिले. अमेरिकेतील निवड समितीत सुनील देशमुख, विद्युलेखा अकलूजकर यांचा समावेश होता.   

First Published on December 18, 2012 5:17 am

Web Title: life time achivement to dr jayant narlikar and thakurdas bang