तुळजापूर विकास प्राधिकरणातील लक्षवेधी प्रकल्प असणाऱ्या गोमुख तीर्थकुंडाचे काम सध्या प्रगतिपथावर असून ११ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पात दररोज ७ लाख २० हजार भाविक स्नान करतील, अशी मोठी क्षमता आहे. देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना याचा लाभ मिळणार आहे.
तत्कालीन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर राज्य सरकारने ३२५ कोटींचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला. यात तुळजाभवानी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुविधा होऊन शहराचे सौंदर्य वाढावे, इतर क्षेत्रांच्या तुलनेत तुळजाभवानीला येणाऱ्या यात्रेकरूंना उत्तम सुविधा मिळाव्यात, भविष्यात वाढत चाललेल्या यात्रा नियोजनासाठी आवश्यक नागरी सोयी पूर्ण व्हाव्यात, या साठी राज्यातील पहिले विकास प्राधिकरण तुळजापूरसाठी देशमुख यांनी स्थापन केले. जागामालक व शहरवासीयांनी केलेल्या सहकार्यानुसार प्राधिकरणाचे काम सुरू आहे.
तुळजाभवानी मंदिर जमीन सपाटीपासून १२५ मीटर खोलीमध्ये आहे. दरीमध्ये असणारी मंदिराची रचना व त्यात पोहोचण्यासाठी पायऱ्या, मंदिराभोवती खंदकांची रचना लक्षात घेता वाढत चाललेल्या यात्रेचे व्यवस्थापन हा मंदिरासमोरील मोठा प्रश्न आहे. येथे बारा महिने चाललेली यात्रा प्रशासनाच्या लक्षात येत नाही. केवळ शारदीय नवरात्रासाठी प्रशासन व सरकारचे इतर घटक लक्ष घालतात. मात्र, १२ महिने शुक्रवार, मंगळवार, रविवार, लगतच्या सुट्टय़ा, उन्हाळा, दिवाळी, ख्रिसमसचे पर्व, लग्नसराई, चत्रीयात्रा, शाकांभरी नवरात्र या काळात लाखो भाविकांची तुळजापुरात गर्दी असते. गोमुख व कल्लोळ तीर्थाची क्षमता लक्षात घेता तुळजापूर विकास प्राधिकरणात बीडकर तलाव या दुर्लक्षित जागेत अत्यंत सुंदर व नयनमनोहर गोमुखकुंड क्रमांक एक व दोन याची उभारणी केली आहे.
अतिवापरानंतर पाणी बदलण्याची अत्याधुनिक यंत्रणा, आठ टाक्यांचा विशाल जलशुद्धीकरण प्रकल्प तळमजल्यात आहे. दर २४ तासांत पाणी शुद्धीकरण केले जाईल. शिवाय पाण्यावरील शेवाळ वा तेलकट पदार्थ ७५ स्टीमरद्वारे स्वयंचलित रीतीने एकत्र केले जाईल. दोन्ही बाजूंनी काळ्या फरशीच्या पायऱ्या आहेत. यात ११५ कमानी व ११८ नक्षीदार खांब आहेत. १२ पितळी १० किलोच्या वजनाचे गोमुख उभारले आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडे काळोबा मंदिरालगत बीडकर तलावात हा प्रकल्प असल्याने काळोबा मंदिराच्या दरीत बांधलेल्या मार्गावरून थेट याच प्रकल्पात येता येते.
घाटशीळ पार्किंगलगत या प्रकल्पाचे प्रवेशद्वार आहे. बीओटी तत्त्वावर याचा वापर होणार असून, नगर परिषदेकडे यांचे हस्तांतरण होणार आहे. लातूरच्या एम. एस. कन्स्ट्रक्शनकडून याची बांधणी होत आहे. आराखडा हेमंत गजबिये यांनी तयार केला. शेख सत्तार व अजिम शेख यांनी प्रकल्प उभारणीत योगदान दिले.
प्रकल्पाची उपयुक्तता
सुमारे ३०० फूट रुंदी व ७०० फूट लांबीच्या जागेत हा प्रकल्प आहे. जून २०११ मध्ये सुरू झालेले प्रकल्पाचे काम येत्या ३१ डिसेंबपर्यंत पूर्ण होईल. कुंड क्रमांक एकमध्ये पुरुषांची, तर दोनमध्ये महिलांसाठी स्नान व्यवस्था. महिला कुंडाची रचना आयताकृती असून येथे २० फूट व १०० फूट असे दोन रंगीत-संगीत कारंजे असतील. पुरुष कुंडामध्ये मेघडंबरीची उभारणी केली आहे. यातही पाण्याचा प्रवाह, रोषणाई असेल. दोन्ही विभागात प्रत्येकी ३० कपडे बदलण्याचे कक्ष, तसेच शौचालय-स्वच्छतागृहांची, भाविकांचे साहित्य ठेवण्यासाठी कुलूपबंद सोय असेल. एका मिनिटात ५०० लोक स्नान करू शकतील, अशी प्रकल्पाची क्षमता असून १२ तासात ३ लाख ६० हजार व २४ तासात ७ लाख २० हजार भाविकांना येथे स्नान करता येईल.