यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात गुजरी येथे शेतात वीज पडून सहाजण ठार झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. मात्र शेतमालक अरूण गोंडे  हे आज (सोमवारी) सकाळी शेतात गेल्यानंतर ही घटना समोर आली. मृतांमध्ये अभिमान विश्वनाथ अंबाडरे (५०), मंदा अभिमान अंबाडरे (४८), लक्ष्मण बापूराव कोहळे (३५), सुभाष रामू नेहारे (२०), साहेबराव गुलाबराव देवनरे (३५) आणि पिसाबाई साहेबराव देवनरे (३०) यांचा समावेश आहे. सर्व मृत कळंब तालुक्यातील निमगव्हाण, खोरपारखिंडी या गावातील रहिवासी आहेत.

राळेगाव येथील अरुण गोंडे यांच्या गुजरी शिवारातील शेतात हे सर्वजण महिनाभरापासून जनावरं चराईसाठी घेऊन आले होते. त्यांचे वास्तव्य शेतातच एका पत्र्याच्या शेडमध्ये होते. रविवारी सायंकाळी परिसरात वादळी पाऊस झाला. यावेळी हे सर्वजण या पत्र्याच्या शेडमध्ये बसले होते. दरम्यान सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या ठिकाणी वीज कोसळल्याने या सहाजणांचा मृत्यू झाला.

या शेडलगत असलेल्या गायी, बकऱ्या आदी जनावरं या घटनेतून बचावले. राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.