नाशिकच्या काही भागांसह दिंडोरी,गिरणारे, नांदगाव तालुक्यास मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पुन्हा झोडपून काढले. वीज पडून नाशिकरोड परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या वादळी पावसाच्या माऱ्याने शेतीसह घरे, वीजपुरवठा व्यवस्था आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारी त्यात आणखी भर पडली.
अनेक ठिकाणी द्राक्ष बागांसह हरितगृह जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
मागील सात ते आठ दिवसांपासून जिल्ह्य़ात वादळी पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्य़ातील अनेक भागांना आधीच त्याचा जबरदस्त तडाखा बसला असताना वारंवार कोसळणाऱ्या संकटातून शेतकरी वर्गास सावरणेही अवघड झाले आहे. मंगळवारी सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता.
दुपारी तीनच्या सुमारास गिरणारे, दिंडोरी, नांदगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. नाशिकरोडच्या आसपासच्या भागात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. नानेगावजवळ वीज पडून समाधान संतू दाते (२६, रा. तळेगाव-अंजनेरी) या युवकाचा, तर पळसे येथेही वीज पडून एकाचा मृत्यू झाला. वादळी पावसात ग्रामीण भागात शेकडो घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघडय़ावर आले. दिंडोरी व नांदगाव तालुक्यात वादळी पावसाने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. गिरणारे व दिंडोरी तालुक्यात हरितगृहांची तीच अवस्था झाली. हरितगृहांच्या उभारणीसाठी अनेकांनी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. नैसर्गिक संकटात क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. शेतीची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे.