News Flash

“शिवसेना खासदारावर कारवाई करून आम्हालाही नाईक कुटुंबीयाप्रमाणे न्याय द्या”; उद्धव ठाकरेंकडे मागणी

शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यावर कारवाईची मागणी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची तत्परतेने दखल घेत ज्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली, अगदी तसेच आपले दिवंगत पती दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ढवळे कुटुंबीयांनी उस्मानाबाद येथे गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मागील वर्षभरापासून रखडलेल्या तपासावर संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत दस्तूरखुद्द उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेत ढवळे कुटुंबीयांना वार्‍यावर सोडणार नाही. त्यांना नक्की न्याय मिळेल, असे वचन दिले होते. याची आठवण वंदना ढवळे यांनी करून दिली. आर्थिक फसवणूक आणि त्यामुळे वाट्याला आलेली मानहानी यातून आपले पती दिलीप ढवळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यापूर्वी आपल्या आत्महत्येस ओम राजेनिंबाळकर आणि विजय दंडनाईक जबाबदार असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. तरी देखील घटना घडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होवून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले नसल्याचेही ढवळे यांनी सांगितले.

ढवळे यांचे बंधू राज आणि पुत्र दीपक यांनीही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत आपण मुंबई येथे जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आणि खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यामुळे आपल्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटाची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. नाईक कुटुंबीयांचे गार्‍हाणे ऐकून त्यांनी तत्काळ कारवाई केली. अगदी त्याचप्रमाणेच आरोपी असलेल्या स्वतःच्या पक्षातील खासदाराला पाठीशी न घालता ते आम्हा कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षाही राज ढवळे यांनी व्यक्त केली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 6:16 pm

Web Title: like anvay naik we also want justice dilip dhavale wife demand to cm uddhav thackeray dmp 82
Next Stories
1 दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू
2 अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस
3 कांद्याचं बियाणं व रोपांचा साताऱ्यात तुटवडा, मनमानी भावांमुळे शेतकरी अडचणीत
Just Now!
X