मुंबई, पुणे, हिंजवडी प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. सुमारे शंभर एकर जागेमध्ये हा उद्योग सुरू करण्यात येणार आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (शनिवार) जाहीर केले. केनवडे (ता. कागल) येथे नव्याने उभारणी केलेल्या अन्नपूर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. या रसायनमुक्त साखर आणि गुळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला.

यावेळी देसाई म्हणाले, मागील फडणवीस सरकार उद्योगांमधील गुंतवणूक करण्याबाबत नुसते करारच करत होते. त्यांच्यात या बाबतीत उत्सवप्रियता होती. ती टाळून महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चितपणे गुंतवणूक होईल, अशा उद्योगांना प्राधान्य देत आहे. चांगल्या सुविधा, सवलती दिल्या जात असल्याने उद्योजकांचा ओढा महाराष्ट्राकडे आहे. या माध्यमातून राज्याचा महसूल वाढणार आहे. लाखो तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे याचा अधिक आनंद आहे.

तसेच, राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक होत आहे. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. अनेक उद्योगांशी याबाबत बोलणं सुरू आहे. विशेषता आयटी पार्क बाबत उद्योजक इच्छुक आहेत. येथे शंभर एकर जागेमध्ये हा उद्योग सुरू केला जाणार आहे. याबाबत उद्योजकांची बैठक सुद्धा घेण्यात येणार आहे. अन्नपूर्णा साखर कारखान्यासही राज्य शासनाच्या उद्योग धोरणातून निश्चितपणे मदत केली जाईल, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार संजयसिंह जयसिंग घाटगे यांनी प्रास्ताविकात २५ वर्षांच्या संघर्षानंतर हा कारखाना साकारला आहे. यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला आहे, असे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य अंबरीशसिंह घाटगे यांनी स्वागत केले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांची भाषणं झाली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश हाळवणकर,अरुण इंगवले आदी यावेळी उपस्थित होते