प्रशांत देशमुख

भारतात करोनाची साथ समुदायात पसरलेली नाही. दक्षिण कोरियाप्रमाणेच सरकारच्या सूचनांचे कसोशीने पालन केल्यास साथीला आवर घातला जाऊ शकतो, अशी भावना तेथे कार्यरत भारतीयांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली आहे.

दक्षिण कोरियातील गोजे येथे सॅमसंग कंपनीचा २५ हजार कर्मचारी कार्यरत असलेला उद्योग आहे. त्यात कार्यरत काही भारतीयांपैकी एक असलेले वरिष्ठ अभियंता सचिन गुंडेराव चौधरी यांनी या अनुषंगाने ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. मूळचे आर्वी येथील असलेले चौधरी गेल्या आठ वर्षांपासून परिवारासह तिथे राहतात.

भारतात स्थिती नियंत्रणात यावी म्हणून काही उपाय कोरियात कार्यरत भारतीयांनी आपली भावना व्यक्त करताना सुचवले.

नागरिकांच्या सहकार्यामुळेच रुग्णसंख्येत सुरुवातीला दुसऱ्या क्रमांकावर असणारा कोरिया आता नवव्या क्रमांकावर घसरला. हा आजार भारतात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात गांभीर्याने घेतला गेला. कोरियात मात्र जानेवारीतच उपाययोजना सुरू झाल्या. प्रामुख्याने टेस्टिंग किट तयार करण्यास प्राधान्य देण्यात आले. दरदिवशी दहा ते पंधरा हजार तपासण्या सुरू झाल्या. विषाणूबाबत दहा मिनिटात माहिती होते. अमेरिकेत हेच प्रमाण शंभर तपासण्यांचे आहे. घरीही ही तपासणी होऊ शकते. घराबाहेर जाणे येणे टळते. शंभर मीटरच्या परिसरातील रुग्णाची जाहीर माहिती दिली जाते. तेथे १६ मार्चपासून सार्वत्रिक तपासणी सुरू झाली आहे. आठवडय़ाला ३ लाख तपासणी पेटय़ा तयार केल्या जात असून आता निर्यातही होत आहे. कोरियात सुरुवातीला करोनाचा संसर्ग अत्यंत कमी प्रमाण होते. सरकारने मास्क अनिवार्य केला. मात्र चर्चमध्ये मात्र धर्मगुरूने यास नकार दिला. एका रुग्ण महिलेमुळे  चर्चमध्ये साथ पसरल्यावर वेगाने हालचाली झाल्या.

तेथे कामापुरतेच नागरिक घराबाहेर पडतात. स्वच्छता पाळतात. प्रत्येक वस्तू ऑनलाईन उपलब्ध आहे. शाळा बंद असून स्काईपद्वारे शिक्षण सुरू आहे. करोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास तात्काळ विलगीकरण केले जाते. आतापर्यंत तीन लाखावर तपासण्या झाल्यात. रस्त्यावर वाहनातील व्यक्तींचे तापमान ओळखणारी यंत्रणा कार्यरत आहे. अधिक ताप असणारी व्यक्ती आढळल्यास तिचा पाठलाग करून तपासले जाते. कार्यालये नियमित सुरू आहेत. दर अध्र्या तासाने कर्मचाऱ्यांना हात धुण्यास सांगितलेले आहे. जेवण टेबलवरच घेण्याची सूचना आहे. सूचनेचे नागरिक पालन करीत आहे. उजव्या हाताचा सर्वाधिक वापर होतो. म्हणून त्याऐवजी डाव्या हाताचाच स्नानघर, दारावरची बेल वाजवणे, वाहतुकीत व अन्य कार्यात उपयोग केला जात आहे. डावखुऱ्या व्यक्ती उजव्या हाताचा वापर करतात. म्हणजे चेहऱ्यावर तो हात वारंवार जात नाही. साथ नियंत्रणात हा उपाय महत्त्वाचा ठरल्याचे चौधरी सांगतात.

भारतात साथीचा शिरकाव होण्यापूर्वी कोरियात साथ पसरल्यावर येथील भारतीय येनकेन प्रकारे भारतात परतले. माझीही तयारी होती, पण वरिष्ठांनी समजावले. आता येथून निघताना प्रवासात प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून टाळलेलेच बरे. ते पटल्याने मी थांबलो. आता भारतात गेल्या आठवडय़ात सिंगापूर मार्गे परतले. त्यांना कोरिया सुरक्षित वाटल्याने ते इथे परतल्यावर सर्वप्रथम त्यांना सात दिवस विलगी करणात ठेवण्यात आले. या सातही दिवसांचे वेतन त्यांना मिळणार आहे. इतरही सुविधा राहतीलच. दैनंदिन तपासणी होत आहे. शिखरावरून खाली घसरल्यानंतर भारतीयांचे परतणे हा एक मोठा बदल असल्याचे मत चौधरी नोंदवतात. कोरियात वैद्यकीय क्षेत्रातही कोरियन बोली आहे.  साथीबाबत काहीच लपवता येत नाही, असे प्रशासन तत्पर आहे. भारतीयांनीही प्रशासकीय व आरोग्य विभागाच्या सूचनांचा अवलंब करावा, असे येथील वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांचे सांगणे असल्याचे सचिन चौधरी म्हणाले.