पंजाबमध्ये शेतकरी चळवळ गेली चार दशके सुरू आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही चळवळ नीट समजून न घेतल्याने शेतकऱ्यांची पोरे असामाजिक तत्वांच्या आहारी गेली. देशाला तत्कालीन पंतप्रधानांना गमावण्याची वेळ आली होती. आताही पंजाबच्या शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरु असताना मागील रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. स्टॅलिनप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताने स्वतःचे हात रंगू नयेत, असा इशारा वजा सल्ला राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.

कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार शेट्टी यांनी शेतकरी आंदोलनावरून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,रावसाहेब दानवे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

दानवे यांना चीनमधून धमकी

ते म्हणाले , मी हाडाचा शेतकरी आहे; कागदावरचा नाही. दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत माझ्य्बाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारणा केली असता स्पष्टीकरण दिले नाही. उलट पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून ते उठून गेले. असे बोलणे केंद्रीय मंत्री असलेल्या दानवे यांना शोभत नाही. दानवे यांना चीनमधून धमकी आली असावी म्हणून ते पत्रकार परिषदेत मधूनच उठून गेले असावेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

फडणवीस पुस्तक काढाच

कोणत्याही भ्रष्टाचाराचे समर्थन अजिबात केले जाणार नाही. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविषयी देवेंद्र फडणवीस यांनी जरूर पुस्तक काढावे. पण गाडीभर पुरावे काढून गाडीच गायब होऊ नये याची काळजी घ्या, असा टोला शेट्टी यांनी मंगळवारी लगावला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष कोण असावेत हा पक्षांतर्गत मामला आहे. पण चंद्रकांत पाटील माझ्याबाबत काहीही बोलत असतील तर ते ऐकून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सदाभाऊ खोत यांच्या दुग्ध अभिषेक आंदोलनावर टिपणी करताना शेट्टी म्हणाले, खोत हे कुठल्यातरी तीर्थक्षेत्राला जाऊन आल्याने कदाचित ते कृषी कायद्यावर दुग्धाभिषेक करत असतील असा टोमणा मारला.