”ऊसतोड मजुरांच्या बाबतीत आपण पूर्वीच्या सरकार प्रमाणे केवळ गप्पा मारणारे नसून, प्रत्यक्ष कृती करणारे आहोत. ऊसतोड कामगारांच्या जीवनात आर्थिक उत्कर्ष साधून, मजुरांचा ऊस उत्पादक झाला पाहिजे तेव्हाच खरे समाधान मिळेल.” असे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काची भाववाढ मिळणे यासाठी आपण सातत्याने राज्य शासनस्तरावर प्रयत्नशील असून, उद्या (दि. २७) साखर संघ, सहकार, कामगार आदी विभागांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच, भाववाढ हा प्रश्न योग्य भाव मिळवून देऊनच मिटवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या साखर पूजन समारंभात ते बोलत होते.

यावर्षी चांगल्या पावसाने उसाचे पीक जोरदार असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव मिळत आहे, असे धनंजय मुंडेंनी सांगितले. तर, बजरंग सोनवणे यांनी विचार मांडताना येडेश्वरी साखर कारखाना स्थापन केल्यापासून या सात वर्षात कारखान्याकडे असलेले ७० कोटी रुपये कर्ज परतफेड करून अंतिम टप्प्यात आणले असल्याचे सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचे कौतुक करत, तुम्ही 7 वर्षात कर्ज फेडले, आता नवीन प्लांट उभा करत आहात, परंतु मी ज्या कारखान्याचा सदस्य आहे, त्या कारखान्यावर संचालक मंडळाने २५० कोटींचे कर्ज करून ठेवले आहे, असा टोला विरोधकांना लगावला.
यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, शिवाजी सिरसाट, पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील, विलासकाका सोनवणे, शंकर उबाळे, बबन लोमटे, नंदूदादा मोराळे, बाळासाहेब बोराडे, नारायण घुले आदी उपस्थित होते.

धनेगावच्या मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न –
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाचे जलपूजन करण्यात आले. मागील काही वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील धरणं मोठ्या प्रमाणात भरली आहेत. तरी, शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा असे आवाहन यावेळी धनंजय मुंडेंनी केले. यावेळी बजरंग सोनवणे, दत्ता आबा पाटील यांच्या एका शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार उजनीचे पाणी मांजरा धरणासाठी आणणे, तसेच मांजरा धरणाचे लाभार्थी असलेल्या उस्मानाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यांना पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडेंनी सांगितले.