14 December 2017

News Flash

मराठी साहित्य आजही मर्यादित

मराठी साहित्यिकांमध्ये आणि त्यांच्या लेखनात लिहिण्याची प्रचंड ताकद असतानाही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी लेखकांची संख्या

शेखर जोशी/ विद्याधर कुलकर्णी, यशवंतराव चव्हाण नगरी, (चिपळूण) | Updated: January 12, 2013 4:25 AM

मराठी साहित्यिकांमध्ये आणि त्यांच्या लेखनात लिहिण्याची प्रचंड ताकद असतानाही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी लेखकांची संख्या कमी आहे. मराठी साहित्यिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यासाठी मर्यादा का येतात, याचा विचार मराठी साहित्यिकांसह साऱ्यांनीच केला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतरच्या भाषणात लेखक आणि कलावंतांनी जीवनसन्मुख व समाजाभिमुख व्हावे, असे सांगतानाच साहित्य क्षेत्रातील राजकारण्यांच्या प्रवेशावरून निर्माण झालेल्या वादंगाबाबतही साहित्यिकांना चिमटे काढले.
चिपळूण येथे आयोजित ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना पवार म्हणाले, ‘समाजात अवतीभोवती घडणाऱ्या विनाशकारी, विघातक घटकांकडे सोयीस्कर डोळेझाक
करून स्वत:च्या हस्तिदंती मनोऱ्यात राहणाऱ्या लेखक आणि कलावंतांनी आपली मुळे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. त्यासाठी लेखक व कलावंताने जीवनसन्मुख व समाजाभिमुख असावे.’
चिपळूण संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे देण्यात आलेले नाव व अन्य वादाचा उल्लेख करून पवार यांनी सांगितले की, आमच्या क्षेत्रात साहित्यिक आले तर आम्ही त्यांना नावे ठेवत नाही. त्यांचे स्वागतच केले आहे. ठाकरे यांचे पत्रकारिता, साहित्याच्या क्षेत्रातील योगदान विसरू शकत नाही. त्यांच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेबाबत विरोध असू शकतो.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यापासून आजचे संमेलनाध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांच्यापर्यंत झालेले विविध संमेलनाध्यक्ष हे वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे होते. यात यु. म. पठाण, केशव मेश्राम, शंकरराव खरात यांचाही समावेश होता. त्यामुळे संमेलनाध्यक्ष व अन्य निर्थक वादात काही अर्थ नाही, असेही पवार ठामपणे म्हणाले.
महिलांच्या साहित्यातून सकस व दर्जेदार लेखनाविष्कार समोर आलेला असताना संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत चार लेखिकाच संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत. स्त्री-लेखकांनी लिहिलेल्या साहित्यावर मोकळेपणाने चर्चा झाली तर स्त्री-साहित्याचे सामथ्र्य आणि मर्यादा आपल्यासमोर येतील असेही पवार यांनी सांगितले.
ज्या लेखकाने साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे त्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद हे सन्मानाने मिळावे. त्यासाठी संमेलनाध्यक्ष निवडीच्या पद्धतीचा फेरविचार करावा, असे आवाहनही पवार यांनी केले.

जगातील टिकून राहिलेले आणि लक्षणीय ठरलेले साहित्य व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते. प्रस्थापित संस्कृतीतील कुरूपता अधोरेखित करण्याचे कार्य हे साहित्य करत असते. त्याचप्रमाणे जीवनाचे खरेखुरे सौंदर्य कुठे आहे आणि कसे आहे, हेही ध्वनित करत असते. अशा प्रकारे प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करू पाहणारेच साहित्य नव्या उन्नत जीवनाची स्वप्नेही पाहते.
– डॉ.नागनाथ कोत्तापल्ले , संमेलनाचे अध्यक्ष

First Published on January 12, 2013 4:25 am

Web Title: limitation for marathi sahitya sammelan sharad pawar