31 October 2020

News Flash

करोना हेल्पलाइनचा मर्यादित वापर

नागरिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात प्रशासनाला अपयश

संग्रहित छायाचित्र

नागरिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात प्रशासनाला अपयश

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्य़ात असलेली तपासणी केंद्र, प्रतिबंधित क्षेत्र, उपचार केंद्र, वैद्यकीय अडचणी इत्यादी माहितीसाठी तसेच तक्रार निवारण करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने महिन्याभरापूर्वी १८००१२१५५३२ हा हेल्पलाइन क्रमांक कार्यरत केला होता. मात्र हा टोल फ्री क्रमांक नागरिकांमध्ये योग्य पद्धतीने प्रसिद्ध करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने त्याचा मर्यादित वापर होत असल्याचे दिसून आले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी झपाटय़ाने वाढत असताना अनेक रुग्णांना माध्यमिक स्वरूपाचे उपचार आणि काही रुग्णांना अतिदक्षता विभागात हलवणे गरजेचे होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना जिल्ह्य़ात असलेल्या उपचार केंद्रांमधील रिक्त असलेल्या खाटांची माहिती सहजगत मिळावी आणि गरज भासल्यास किंवा स्वत:ची इच्छा असल्यास खासगी ठिकाणी उपचार घेण्यासाठी माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जुलै महिन्याच्या मध्यावर टोल फ्री क्रमांकाद्वारे मदत वाहिनी कार्यरत केली होती. या क्रमांकाची माहिती सर्व तालुक्यांतील तहसीलदार आणि शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली असली तरीही त्याची सर्वसामान्यांपर्यंत प्रसिद्धी झाली नसल्याने त्याचा वापर मर्यादित स्वरूपात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाने जुलै महिन्यात या प्रकारचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले नाही. त्याचप्रमाणे या क्रमांकाची माहिती प्रसिद्धी फलकाद्वारे किंवा उपचार केंद्रांच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली नाही.

या क्रमांकावर तीन सत्रांमध्ये तालुकानिहाय मदतीस कार्यरत ठेवण्यात आले असून त्यांच्याकडे तालुक्यात असलेल्या करोना उपचार केंद्रांची, फिव्हर क्लिनिक, करोना चाचणी करणारी केंद्र, अधिकारी वर्गाचे संपर्क माहिती, प्रतिबंधित क्षेत्राविषयी माहिती, घरी विलगीकरण करण्यासाठी आवश्यक सोपस्कार करावयाची माहिती तसेच दररोज अद्ययावत होणारी उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती उपलब्ध करून द्यायची व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्याच पद्धतीने

करोना उपचार केंद्रांमध्ये जेवणाचा किंवा इतर सोयी सुविधांबाबत तक्रार दाखल करण्यासाठी या हेल्पलाइन क्रमांकावर तरतूद करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेसाठीही या हेल्पलाइनचा वापर करणे शक्य असले तरी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत टोल फ्री क्रमांक पोहचू न शकल्याने त्याच्या मर्यादित स्वरूपात वापर होत असल्याचे दिसून आले आहे.

‘वेबपोर्टल’ प्रकाशित होणार

पालघर जिल्हा प्रशासनातर्फे विविध शासकीय व खासगी उपचार केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या विलगीकरण खाटा, उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार केंद्रांवरील खाटा तसेच खासगी रुग्णालयातील उपलब्ध खाटा या संबंधात माहिती दर्शवणारे डॅशबोर्ड (संकेतस्थळ) कार्यरत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. सध्या या संकेतस्थळामध्ये खासगी रुग्णालयातील माहिती तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांची माहिती अंतर्भूत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयी व इच्छेनुसार उपचार केंद्र निवडणे शक्य होणार आहे.

सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरू

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करोना उपचार केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे बंधनकारक आहे. उपचारासाठी अधिग्रहित केलेल्या आश्रमशाळा व काही उपचार केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कार्यरत असून नव्याने उभारण्यात आलेल्या करोना उपचार केंद्रांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम निविदा स्तरावर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे.

अधिकारी वर्गाची माहिती संकेतस्थळावर

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना नियंत्रण कक्ष व अधिकारी वर्गाचा संपर्क करायाचा असल्यास त्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात  तालुकानिहाय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक तसेच पालघर जिल्हा कोविड नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही माहिती  ddma.palghar.info या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* जिल्हा करोना टोल फ्री क्रमांक : १८०० १२१ ५५३२

* जिल्हा आपत्ती निवारण कक्ष संकेतस्थळ :ddma.palghar.info

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 4:18 am

Web Title: limited use of the corona helpline zws 70
Next Stories
1 Coronavirus : तारापूर औद्योगिक वसाहतीला करोनाची लागण
2 समाजमंदिरांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
3 Coronavirus  : पालघर तालुक्यात करोनाचा मोठा प्रादुर्भाव
Just Now!
X