19 September 2020

News Flash

बेसुमार कूपनलिकांनी जमिनीची चाळण, सरकारी यंत्रणा हतबल

ग्रामीण भागात शेतीसाठी तर शहरात घर तिथे कूपनलिका घेण्याची स्पर्धाच सुरू आहे. परप्रांतातून आलेल्या बोअरवेल्सच्या यंत्रांनी जमिनीची चाळण केली आहे.

| January 26, 2015 01:55 am

भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी आणि दोनशे फुटापर्यंत कूपनलिका घ्यावी हा सर्वसाधारण नियम बासनात गुंडाळून जमिनीतून पाणी बाहेर कोढण्यासाठी ६०० फुटांपर्यंत कूपनलिका राजरोसपणे घेतल्या जातात. ग्रामीण भागात शेतीसाठी तर शहरात घर तिथे कूपनलिका घेण्याची स्पर्धाच सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने परप्रांतातून आलेल्या बोअरवेल्सच्या यंत्रांनी जमिनीची चाळण केली आहे. पावसाचे पाणी जिरवण्याची तसदी न घेता पाणी उपसण्याच्या वृत्तीमुळे पातळी खालावत गेल्याने जागोजागी आता धुराळा उडू लागला आहे. बेसुमार कूपनलिकांमुळे नवीनच प्रश्न निर्माण होण्याची भीती भूवैज्ञानिकांकडून व्यक्त होत आहे.
बीड जिल्हा अवर्षणप्रवण क्षेत्रात असून पावसाची वार्षकि सरासरी ७०० मि.मी. असली तरी मागील काही वर्षांपासून सरासरीच्या निम्माच पाऊस पडत असल्याने पाणीटंचाई निर्माण होते. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याची सरकारी यंत्रणेसह सर्वसामान्य नागरिकही फारशी तसदी घेत नाहीत. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे घोषवाक्य म्हटले जाते खरे, पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसून येत नाही. मात्र जमिनीतील पाणी उपसणे आपला हक्कच आहे, अशा वृत्तीतून मनमानी केली जाते. पाणी वापरावर कोणतेही नियंत्रण नसल्याने काही वर्षांतच भूगर्भातील पाणीपातळीही कमालीची घटली आहे. उसाचे पीक भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांनी विहीर कोरडी पडली की कूपनलिका घेण्यावर भर दिला. मागच्या १५ वषार्ंत कूपनलिका घेण्याच्या तंत्रज्ञानात आधुनिकता आल्यामुळे जिल्ह्यात वर्षांला शेकडो कूपनलिका घेऊन पाणी उपसले जाते. परप्रांतातून आलेल्या बोअरवेल्सच्या शेकडो गाडय़ा ऑक्टोबर ते जूनपर्यंत कूपनलिका घेऊन जमिनीची चाळणच करतात. सरकारने जिल्हास्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग स्थापन केला. या विभागाची परवानगी घेऊन कूपनलिका घ्यावी असा नियम आहे. सर्वसाधारणपणे २०० फुटापर्यंतच कूपनलिका घेण्याचे धोरण आहे. मात्र सरकारी नियमाला गुंडाळून मनमानी करण्यातच धन्यता मानली जाते. मागील १५ वर्षांंत सरकारी कूपनलिका व्यतिरिक्त कोणीच भूजल विभागाकडे नोंदणी केली नाही. वर्षांला शेकडो कूपनलिका राजरोसपणे घेतल्या जातात.
एका ठिकाणी पाणी लागले नाही तर जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी कूपनलिका घेण्यावर भर असतो. पाण्याची पातळी चार मीटरने खालावली आहे. असे असले तरी लाखो रुपये मोजून जमिनीतून पाणी काढण्याची स्पर्धाच लागली आहे. शहरी भागात प्लॉट घेतल्यानंतर बांधकाम सुरू करण्यापूर्वी कूपनलिका घेतली जाते. घर तेथे कूपनलिका होत असतानाही सरकारी यंत्रणा काहीही करत नाही.
सध्या जिल्ह्यात मोठय़ा प्रकल्पांमध्ये ८ तर छोटय़ा प्रकल्पांमध्ये ३१ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी प्रत्येकजण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कूपनलिका घेण्याचा प्रयत्न करत आहे.
पाणाडय़ांची चांदी
कूपनलिका घेण्यासाठी पाणाडय़ाला बोलावून जागा निवडली जाते. पाणाडय़ाच्या सांगण्यावरूनच कूपनलिकेवर लाखोंचा खर्च केला जात असल्याने पाणाडय़ांनाही चांगला मोबदला मिळतो आहे. त्यामुळे टंचाईत जमिनीत पाणी सांगणाऱ्या पाणाडय़ांची मात्र चांदी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 1:55 am

Web Title: limitless boarwell land not use
Next Stories
1 ट्रॅक्टरची रिक्षाला धडक; तीन ठार, दहा जण जखमी
2 २१ टीएमसीच्या हक्कासाठी शिवसेना आक्रमक
3 खान्देशात ‘वर्षवेध’चे जोरदार स्वागत
Just Now!
X