भाजपला धडा शिकविण्याचा इशारा

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे करून धक्का दिल्यानंतर त्याचे राजकीय व सामाजिक पडसाद सोलापूर शहर व जिल्ह्य़ात उमटत आहेत. यात धनगर समाजाला खूश करून मुख्यमंत्र्यांनी आपला राजकीय डाव साधला असला तरी राजकीय दृष्टिकोनातून विचार करता शासनाचा हा निर्णय सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. वीरशैव लिंगायत समाजातून सत्ताधारी भाजपने आपला केसाने गळा कापल्याची प्रतिक्रिया सार्वत्रिक स्वरूपात उमटत आहे. त्यामुळे आतापर्यंत भाजपचा आधार असलेला हा समाज आता निर्णायक भूमिका घेऊन भाजपला इंगा दाखवण्याची भाषा करू लागला आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

देशात एकमेव एकाच जिल्ह्य़ासाठी कार्यरत असलेल्या सोलापूर विद्यापीठांना कोणाचे नाव द्यायचे, या मुद्यावर विविध संस्था व संघटनांनी वेगवेगळे २८ प्रस्ताव पाठविले होते. यात वेगवेगळ्या जाती-पंथांच्या महापुरुष व देवदेवतांची नावांचा आग्रह राहिल्यामुळे विद्यापीठाच्या सिनेट मंडळाची अडचण झाली होती. त्यातून सामाजिक परिस्थितीचे भान राखत सिनेट मंडळाने विद्यापीठाला अन्य कोणाचेही नाव न देता सोलापूरचेच नाव कायम ठेवण्याचा ठराव संमत करून शासनाकडे पाठविला होता. या पाश्र्वभूमीवर वीरशैव लिंगायत समाजाने सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर तर धनगर समाजाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव या विद्यापीठाला देण्याची मागणी पुढे रेटत आंदोलन वातावरण चांगलेच तापविले होते. दोन्ही समाजाचे या प्रश्नाच्या मुद्यावर एकमेकांच्या विरोधात हे जणू शक्तिप्रदर्शनच झाल्याचे दिसून आल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनावर जबाबदारी वाढली होती. खरे तर अवघ्या १२ वर्षांपूर्वी स्थापन झालेले सोलापूर विद्यापीठ अद्यापि तसे बाल्यावस्थेत असताना शैक्षणिक गुणवत्ता तथा विकासाचा विचार करता तसे उपेक्षितच होते आणि आहे. त्या अंगाने कधीही सार्वत्रिक चर्चा झाली नव्हती. परंतु नामांतराच्या मुद्यावर या विद्यापीठाची चर्चा राज्यभरात झाली. ही बाब भूषणावह नक्कीच नाही.

तथापि, राजकारणात मतपेढीचा विचार महत्त्वाचा ठरतो. सोलापूर विद्यापीठाचे नामांतरासाठी अस्मितेच्या राजकारणाची व जातीय मतपेढीचीच पट्टी लावली गेली आहे. विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता कशी का असेना, त्याचा विचार करणे शासनाला व राजकीय पुढाऱ्यांना तितकासा गरजेचा वाटत नाही. तर नामांतर हेच महत्त्वाचे समजल्याची गोष्ट अधोरेखित झाली आहे. या विद्यापीठाच्या नामांतरानंतर पुढे कशा घडामोडी घडणार? क्रिया-प्रतिक्रिया कशा प्रकारे उमटणारआणि त्यातून चांगले-वाईट परिणाम कसे होणार, याकडे तमाम सोलापूरकरांचे लक्ष वेधले आहे. यानिमित्ताने सोलापूरचे वातावरण मात्र ढवळून निघाले आहे.

सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजाचे पूर्वीपासून प्राबल्य होते. ग्रामदैवत सिद्धेश्वरांचा वास्तव्यकाळ बाराव्या शतकातील. नंतर मुस्लीम राजवटीतदेखील बहामनी, आदिलशाही व निझामशाही आणि मोगलांपासून ते पेशवाईपर्यंत येथील देशमुखी, पाटीलकीची परंपरा लिंगायत समाजाकडेच चालत आली होती. स्वातंत्र्यानंतरही येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, व्यापार, औद्योगिक, शेती अशा सर्व क्षेत्रात लिंगायत समाजाचेच वर्चस्व होते. मात्र कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या सोलापूरकडे पाहण्याचा यशवंतराव चव्हाण आदींचा दृष्टिकोन बदलला आणि लिंगायत समाजाला शह देण्याच्या राजकारणातून पद्मशाली विणकर समाजाला थारा मिळत गेला. सध्या तर येथील लिंगायत समाज जवळपास निर्नायकी झाला असतानाच सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्यावर झालेल्या सत्त्वपरीक्षेत या समाजाच्या धुरिणांना सपशेल तोंडघशी पडावे लागले. विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी स्थानिक नेतृत्वापेक्षा मराठवाडय़ातील शिवा वीरशैव युवक संघटनेचे नेते प्रा. मनोहर थोंडे यांना सोलापुरात यावे लागले. ही बाब सुध्दा स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादावर बोट ठेवणारीच आहे. तसे पाहता ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर व सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची सूत्रे गेली अनेक वर्षे स्वत:कडे ठेवणारे धर्मराज काडादी व पालकमंत्री विजय देशमुख हे दोनच नेत्यांची सोलापूरच्या वीरशैव लिंगायत समााजातून पुढे येतात. काडादी हे स्वभावत: मवाळ तर पालकमंत्री विजय देशमुख यांच्याकडे राजकीय पिंडाचा तसा अभावच. मात्र तरीही दोघांत सख्य तर दिसत नाही, तर वैमनस्यच जास्त असल्याचे चित्र सोलापूरकर पाहात आहेत. तीन वर्षांपूर्वी सिद्धेश्वर यात्रेत त्याचे प्रथम दर्शन घडले. त्यानंतर आता विद्यापीठ  नामांतराच्या प्रश्नावर आंदोलनकर्ते प्रा. मनोहर धोंडे व धर्मराज काडादी यांनी शासनाच्या विरोधात भूमिका घेताना त्यात पालकमंत्री विजय देशमुख यांनाच लक्ष्य केल्याचेही काही लपून राहिले नाही. यापूर्वी शिवा वीरशैव युवक संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रात पदार्पण केलेले पालकमंत्री विजय देशमुख हे आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवा संघटनेपासून सोयीनुसार स्वत:ला दूर ठेवले. तीनवेळा आमदारकी सांभाळणारे देशमुख यांचे पाय आता तर जमिनीवरच नाहीत, अशी बोचरी टीका प्रा. धोंडे हे विद्यापीठ नामांतराच्या मुद्यावर करतात. यातच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी विमानतळासाठी अडथळा ठरते म्हणून पाडून टाकण्याची कारवाई हाती घेतली जाते, तेव्हा यामागे पालकमंत्री देशमुख यांचाच हात असल्याची शंका लिगायत समाजात बळावत चालली असतानाच आता विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे लिंगायत समाज बिथरला आहे. काँंग्रेसच्या विरोधात आतापर्यंत प्रतिक्रिया म्हणून सोलापुरातील लिंगायत समाज भाजपला साथ आला होता. परंतु आता विद्यापीठ नामांतराच्या मुद्यावर या समाजाचा कल आता भाजपच्या विरोधात चालल्याचे दिसून येते. यात खरी परीक्षा पालकमंत्री विजय देशमुख यांची होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेव्हा सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा नागपुरातून केली, तेव्हा पालकमंत्री देशमुख हे सोलापुरातच होते. त्यांनी या प्रश्नावर होणारी आपली अडचण लक्षात घेऊन कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन साधणे पत्करले. विद्यापीठ नामांतर प्रश्नावर वीरशैव लिंगायत समाजाने प्रतिक्रियात्मक आंदोलन छेडण्याचा निर्धार केला असताना पालकमंत्री देशमुख हे किती दिवस या प्रश्नावर मौन बाळगतात, हीदेखील त्यांची परीक्षाच ठरणार आहे. सध्या तरी या प्रश्नावर देशमुखांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशीच झाल्याचे दिसते. वीरशैव लिंगायत समाजाच्या या विजय देशमुखांची राजकीय व सामाजिक कोंडी होत असताना दुसरीकडे त्यांचे सत्ताधारी भाजपअंतर्गत प्रतिस्पर्धी समजले जाणारे मराठा समाजाचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे मनोमन खुशीत असल्याचे बोलले जात आहे.