रक्तटंचाईसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन

जिल्हा रुग्णालयातील रक्तटंचाई निवारणासाठी खोपोली येथील लायन्स क्लबने पुढाकार घेतला असून खालापूर येथील पारले कंपनीत तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी ६४ जणांनी रक्तदान केले. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सध्या रक्ताचा अपुरा साठा असल्याने अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे, याबाबत वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या. यात रक्तदात्यांनी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत रक्तदान शिबीर भरवत जिल्हा रुग्णालयासाठी रक्त उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करण्यात आले होते, त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देत खोपोली लायन्स क्लबने खालापुरातील खिरकिंडी येथे असणाऱ्या पारले कंपनीच्या संयुक्त विद्यमाने काल तातडीचे रक्तदान शिबीर आयोजित केले होते, जीवनदान देणाऱ्या या महान सामाजिक कार्यात अनेकांनी ‘आपले रक्त कुणाचा तरी प्राण वाचवू शकते’ या सामाजिक भावनेतून उत्स्फूर्तपणे ६४ रक्तदात्यांनी ‘रक्तदान’ केले. रक्तदान शिबिराची सुरुवात मििलद पाटील यांनी रक्तदान करून केली. लायन्स क्लबने २०१५-१६ या वर्षांतील आयोजित केलेले हे तिसरे रक्तदान शिबीर आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन शेखर जांभळे, लायन नकुल देशमुख, लायन अल्पेश शाह तसेच प्रोजेक्ट चेअरमन लायन रहीम सोरठिया व पारले बिस्किट्स कंपनीचे सहव्यवस्थापक (मानव संसाधन विकास) किशोर शेळके, राजेश राऊळ (युनिट हेड) व संपूर्ण पारले कंपनी कर्मचारी तसेच जिल्हा शासकीय रक्तपेढी, अलिबागचे डॉक्टर दीपक गोसावी, प्रमोद जगताप, शैलजा केकान, अपर्णा जांभळे, सचिन धाकने, मंगेश नाईक, महेश घाडगे यांनी अथक परिश्रम घेतले.