धवल कुलकर्णी

सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मद्य विक्री होत नसल्याने आणि बिअर बार ही बंद आहेत.  याचा परिणाम सरकारी तिजोरी मध्ये भरीव पद्धतीने भर टाकणाऱ्या उत्पादन शुल्क खात्याचा महसूल मात्र लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणपणे पंचावन्न कोटी विदेशी मद्य आणि देशी मद्याची विक्री होते तर ३० कोटी लिटरच्या दरम्यान बिअरचा सेल होतो.

मद्य विक्रीतून महाराष्ट्र सरकारला मागच्या वर्षी रुपये १५,३२३ कोटी इतके उत्पन्न मिळाले होते आणि यावर्षीचे टारगेट  १७,९७७  कोटी होते. मात्र लॉकडाउन यात चांगलीच घट होऊ शकते. फेब्रुवारी अखेरपर्यंत खात्याने  १५,२०० कोटीच्या दरम्यान महसूल जमा केला होता आणि आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा आकडा साधारणपणे  १६,७०० कोटीपर्यंत जाईल असा अंदाज होता. पण लॉकडाउन मुळे सर्व मद्य विक्री दुकानांना टाळे लागले आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत देशी मद्याचा खप हा साधारणपणे ४.६ टक्‍क्‍यांनी वाढला होता तर विदेशी मद्य, आणि वाइन ची विक्री ही ६.७ टक्के, ३ टक्के, आणि ७ टक्क्यांनी वाढली होती.

पण राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मान्य करतात की मद्य मिळत नसल्याने  नाईलाजाने का होईना दूर राहायला लागल्यामुळे लॉकडाउन संपेपर्यंत कदाचित अनेक तळीरामांची दारूची सवय सुटू शकते. शक्यता अशीसुद्धा आहे दारूची सवय अगदी असह्य झाली तर पिणाऱ्यांची पावले कदाचित बेकायदेशीर दारू किंवा हातभट्टी कडे सुद्धा वळू शकतात. त्याबाबत पोलीस आणि प्रशासनाने जागरूक राहायला हवं.