अर्थसंकल्पाच्या वेळी दारूच्या किमतीत वाढ होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिल्यानंतर राज्याच्या उत्पादनशुल्क विभागाने वार्षिक परवान्यासाठी दहा टक्क्यांची वाढ केली. परिणामी, आगामी काळात दारूच्या किमतीत वाढ होणार असल्याचे स्पष्ट आहे.
अर्थसंकल्पाच्या वेळी दारू, तंबाखू, सिगारेट व अन्य वस्तूंच्या किमतीत वाढ होईल, असे संकेत अर्थमंत्र्यांनी दिले होते. आता त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यभरात बारचालक, देशी दारूविक्री, बीअर शॉपी, वाइन शॉप यांना दरवर्षी एप्रिलमध्ये परवाना नूतनीकरण करून घ्यावे लागते. परवाना नूतनीकरणासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून शुल्क आकारले जाते.
देशी दारू दुकानदारांसाठी गतवर्षी चांगला दिलासा होता. सन २०१३-१४ व २०१४-१५मध्ये कोणतीही वाढ झाली नव्हती. १ लाख ४२ हजार रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात आले होते. बारचालकांसाठी गेल्या वर्षी २ लाख ७३ हजार ६०० रुपये शुल्क होते. आता यात १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
महापालिका हद्दीत बीअर बार चालवणाऱ्यांकडून २०१४-१५साठी ३ लाख ९६० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. देशी विक्रेत्यांनाही ही दहा टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात म्हणजेच ग्रामपंचायत हद्दीत बार चालवणाऱ्यांना गतवर्षी १ लाख ८० हजारांच्या आसपास वार्षिक शुल्क होते. त्यात आता १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बारचालकांना उत्पादन शुल्क विभागाव्यतिरिक्त अन्न व औषध प्रशासन, उपाहारगृह चालवण्याचा परवाना तसेच दुकान विक्री अधिनियमान्वये परवाना घ्यावा लागतो. या वेगवेगळय़ा परवान्यांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते.
उत्पादन शुल्क विभागाने केलेली दरवाढ, वीजबिल, पाणीपट्टीत झालेली वाढ तसेच अन्य वस्तू महागल्याने आता मद्याचे दर वाढणार हे निश्चित आहे. विविध परवान्यांसाठी गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पसे मोजावे लागत आहेत. शिवाय महागाई वाढली. त्यामुळे आम्हाला भाववाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या दरवाढीविरोधात बार असोसिएशनने कोणतीही उघड प्रतिक्रिया दिली नसली, तरी आम्हाला जादा किंमत मोजावी लागली तरी त्याचा भार ग्राहकांवरच पडतो, असे बार असोसिएशनने म्हटले आहे.