वर्ध्यातील वायगाव या ठिकाणी दारु गाळण्यासाठी कोठ्यात तळघर तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वायगावमध्ये राहणारा सुमेध नगराळे हा ३४ वर्षीय तरुण या मागे आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्यांनी या तरुणाच्या शेतातील शिवारात असलेल्या कोठारावर छापा टाकला. या छाप्यात त्यांना छुपं कोठार आढळून आलं. या कोठारात मोहाची दारु गाळली जात असल्याचंही उघड झालं. सुमेध नगराळे समोर असतानाच या कोठाराची बारकाईने पाहणी करण्यात आली.

कोठारातील  दुसऱ्या रूम मध्ये कापसाचे भरपूर प्रमाणात गाठोडे रचून ठेवले होते सदर गाठोडे बाजूला सरकवून बारकाईने पाहणी केली असता तेथे त्यांना भुयारी मार्ग सापडला. या मार्गाने शिडीतून तळघरात प्रवेश करतात तिथे १५ ड्रम म्हणजेच अंदाजे ३ हजार लिटर कच्चं मोह रसायन साठवून ठेवलं होतं. तळघरात इलेक्ट्रिकची फिटिंग केली होती व मोटर पंप द्वारे सदर सडवा बाहेर आणून हा तरुण मोहाची दारू गाळत असे असे निदर्शनास आले. हा सगळा मुद्देमाल जाळून टाकण्यात आला. तसेच मोटार जप्त करण्यात आल्या.

सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सा, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा,पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे स्था. गुन्हे शा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि आशिष मोरखडे, पो.हवा निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, ना.पो. शी विकास अवचट पो.शी संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, नितीन इटकरे यांनी केली