नाव सांगणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

पोलिसांना अवैध दारू विक्रेत्याची माहिती सांगितली असता अवघ्या काही वेळातच दारू विक्रेत्याने भ्रमणध्वनीवरून भद्रावती भाजप शहर सरचिटणीसला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दारू व्यावसायिकास माझे नाव सांगणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपचे महामंत्री प्रशांत डाखरे यांनी दिला. माझ्याकडून पोलिसांना दिल्या गेलेली गुप्त माहिती त्या दारू विक्रेत्यास काही अवधीतच पोहचली कशी, असा प्रश्न डाखरे यांनी उपस्थित केला.

स्थानिक सुरक्षा नगर येथील रवि सिडाम हा अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे यांना दिली. त्यांनी हवालदार शेरकी यांना यासंदर्भात कारवाई करण्यास सांगितले, पंरतु कारवाई तर दूरच काही वेळातच अवैध दारू विक्रेता रवि सिडाम यांने डाखरे यांना भ्रमणध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यामुळे चिडलेल्या सिडाम यांनी पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण घरी पोहोचल्याने डाखरे यांचे कुंटुंब दहशतीत आहे. दिलेली माहिती काही वेळातच त्या व्यावसायिकांपर्यंत पोहचवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू, असे डाखरे यांनी सांगितले.