माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनीय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर सोमवारी एकवटले. विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि चौकशीची मागणी केली.

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनीतील बंगल्याची झाडाझडती घेतली. शंकरराव घरात नाहीत, हे प्रशांत गडाख यांनी पोलिसांना सांगूनही त्यांनी ऐकले नाही. गडाख यांच्या शयनगृहापर्यंत जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेत यशवंतराव गडाख यांच्याशी अशोभनीय वर्तणूक केली होती.

त्याचा निषेध करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना  निवेदन दिले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांबळे, सुधीर तांबे यांनीही या घटनेचा निषेध करण्यासाठी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेतली.या गोष्टीची गंभीर दखल घेणे गरजेचे असून राजकीय वैमनस्यातून ही कृती झाली असल्याची शंका रामदास फुटाणे यांनी वर्तविली.

पाच दशकांच्या राजकारणात अनेकांनी मला व मी अनेकांना राजकीय विरोध केला. पण त्याची मर्यादा आणि भान आम्ही सर्वानी नेहमीच ठेवले. त्याला वैयक्तीक आणि कौटुंबिक स्वरूप कधीच येऊ  दिले नाही. आता  सूडात्मक राजकारण करणारांचा दर्जा आणि पद्धत  हीन झाली आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक आहे, अशी प्रतिक्रिया यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली.