News Flash

उस्मानाबाद : असमन्वयाचा फटका चिमुकल्यांना बसू नये; हवालदिल झालेल्या मातेची प्रशासनाकडे मागणी

प्रशासनामध्ये असमन्व आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवीची उत्तरं

उमरगा : प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका येथील एका गरीब कुटुंबास सहन करावा लागत आहे.

उमरगा शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत आहे. मागील तीन दिवसात शहरात तब्बल ९० पेक्षा अधिक कुटुंबात करोनाची बाधा पोहचली आहे. तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या दोन शतकाचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. एकीकडे करोना रुग्णांची वाढती संख्या आणि दुसरीकडे प्रशासनात असलेला समन्वयाचा अभाव यामुळे बाधित रुग्णाच्या कुटुंबियांची मोठी हेळसांड होत आहे. नागरिकांनी पुढाकार घेत सातत्याने तक्रार आणि पाठपुरावा केल्यानंतरही अकरा महिने वय असलेल्या दोन जुळ्यांसह त्यांच्या आईची तपासणी करण्यासाठी अद्याप त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. चार दिवसांपूर्वी या चिमुकल्यांचे वडील बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. प्रशासनातील असमन्वयाचा फटका आपल्या चिमुकल्यांना बसू नये, अशी भावुक मागणी हवालदिल झालेल्या आईकडून केली जात आहे.

प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका येथील एका गरीब कुटुंबास सहन करावा लागत असल्याची तक्रार कुटुंबियांच्या नातेवाइकांनी केली आहे. कुटुंबातील सदस्य बाधित असल्याचा अहवाल चार दिवसांपूर्वी प्राप्त होऊनही त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची अद्याप साधी तपासणीदेखील करण्यात आलेली नाही. बाधित रुग्णाच्या कुटुंबात आठ सदस्य आहेत. यात त्याच्या पत्नीसह अकरा महिन्यांच्या दोन जुळ्यांचा समावेश आहे. चार दिवस उलटून गेले तरी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. तसेच कुटुंबातील एकाही व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले नाहीत. परिणामी हे संपूर्ण कुटुंब सध्या दहशतीखाली असून किमान तान्ह्या मुलांच्या काळजीपोटी तरी आमची तपासणी करा अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

शहरातील जुनी पेठ, हमीदनगर, काळे पलॉट व कोळीवाडा या भागात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जुनी पेठ भागातील ३५ वर्षीय कामगार मंगळवारी बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. शहरातील कोविड रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याच्या कुटुंबातील दोन जुळी मुलं, पत्नी, भावाच्या कुटुंबातील चार व्यक्ती व सासू अशा आठ जणांची अद्यापही तपासणी करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अनेक वर्षांच्या उपचारानंतर या दाम्पत्याला जुळी मुले झाली आहेत.

येथील कोविड रुग्णालयचे अधीक्षक अशोक बडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांना घरून आणण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. त्याकरिता पालिकेला दोन रुग्णवाहिकाही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेचे मुख्याधिकारी जाधवर म्हणाले, याबाबत रुग्णालयाने आम्हाला अधिकृत कळवायला हवे. रुग्णाचे नाव व पत्ता माहीती असल्याखेरीज आम्ही त्यांना कसे आणणार. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्याशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर ही बाब जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, अद्यापही त्यांची तपासणी करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 8:30 pm

Web Title: little children should not be hit by incoherence of governance demanded bereaved mother to the administration aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 यवतमाळ : करोना रूग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात ५४ रुग्णांची भर
2 Coronavirus: उमरगा आणि उस्मानाबाद शहरात दुचाकींना प्रतिबंध
3 यवतमाळ : ‘त्या’ करोनाबाधित रूग्णाने जनावरांच्या काळजीने केले होते पलायन
Just Now!
X