28 February 2021

News Flash

‘थिबा संगीत महोत्सवा’चे उद्यापासून थेट प्रक्षेपण

२२,२३ आणि २४ जानेवारी रोजी दररोज संध्याकाळी ७ वाजता हा वार्षिक संगीत सोहळा रंगणार आहे.  

रत्नागिरी :  केवळ रत्नागिरी नव्हे, तर कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या  ‘थिबा संगीत महोत्सवा‘चे यंदा संकेतस्थळाद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आर्ट सर्कल, रत्नागिरी या संस्थेतर्फे येथील ऐतिहासिक थिबा राजवाडय़ाच्या भव्य प्रांगणात २२,२३ आणि २४ जानेवारी रोजी दररोज संध्याकाळी ७ वाजता हा वार्षिक संगीत सोहळा रंगणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेल्या तरुण आश्वासक कलाकारांचे गायन-वादन, हे यंदाच्या चौदाव्या महोत्सवाचे मुख्य सूत्र आहे, असे नमूद करून संस्थेचे अध्यक्ष नितीन कानविंदे यांनी सांगितले की, करोना संकटामुळे बदललेल्या परिस्थितीमुळे प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत संकेतस्थळावरून तिन्ही दिवस थेट प्रक्षेपणाची सुविधा निर्माण केली आहे. त्यामुळे जगभरातील रसिकांना या महोत्सवाचा आनंद उपभोगता येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे राजवाडय़ाच्या प्रांगणातही करोनाविषयक नियमांचे पालन  करून रसिकांना महोत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.  महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (२२ जानेवारी) संध्याकाळी मूळचे आसामचे कलाकार मानसकुमार यांच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे. त्यानंतर गानसरस्वती किशोरी अमोणकर आणि माणिक भिडे यांच्या शिष्या सोनल शिवकुमार यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

जयपूर घराण्याचे आदित्य खांडवे आणि पतियाळा घराण्याचे गायक कौस्तुभ कांती गांगुली महोत्सवात दुसऱ्या दिवशी (शनिवारी) संध्याकाळी गायन सादर करणार आहेत. अभिषेक बोरकर यांच्या सरोदवादनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची (रविवार) सुरुवात होणार असून प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडय़े महोत्सवाचा समारोप करणार आहेत. सर्वश्री तनय रेगे, मंदार पुराणिक, सारंग कुलकर्णी, प्रसाद करंबेळकर, वरद सोहनी, तेजोवृष जोशी, आणि राहुल गोळे हे कलाकार साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण http://www.ticketkhidkee.com या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 2:50 am

Web Title: live broadcast of thiba sangeet mahotsav from tomorrow zws 70
Next Stories
1 राज्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद 
2 रायगडमधील फार्मा पार्क प्रकल्पाला विरोध
3 नंदुरबारमध्ये दुचाकी रुग्णवाहिकेसाठी दिरंगाई
Just Now!
X