News Flash

Ganpati Visarjan MUMBAI : लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा वरूणराजाच्या साथीने भावपूर्ण निरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर जाऊन गणेश विसर्जनाचा आढावा घेतला.

गिरगाव चौपाटीवर भाविकांची झालेली अलोट गर्दी

महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून ख्याती असलेल्या गणरायाला गुरूवारी मुंबईकरांनी वरूणराजाच्या साथीने भावपूर्ण निरोप दिला. हवामान खात्याने भाकित वर्तविल्याप्रमाणे मुंबई आणि परिसरात पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मात्र, तरीही बाप्पांना निरोप देताना मुंबईकरांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नाही. सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, तेजुकायाचा बाप्पा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक चाळीचा गणपती या मुंबईतील मानाच्या गणपतींनी निरोप देण्यासाठी लालबाग-परळ परिसरात मोठा जनसमुदाय जमला होता. बाप्पाचे रूप डोळ्यात साठविण्यासाठी पावसाची तमा न बाळगता अनेकजण रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचे चित्र दिसत होते. लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगजवळ या मानाच्या गणपतींवर पुष्पवृष्टी करण्यात आल्यानंतर या मिरवणुका गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. दरम्यान, गिरगाव चौपाटीसह मुंबईच्या सहा चौपाट्यांवर घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनसाठी जनसागर उसळला होता. गिरगाव चौपाटीजवळ गिरगावचा राजा, गिरणगावचा राजा, काळाचौकीचा महाराजा, चंदनवाडीचा राजा, खेतवाडीचा महाराजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता या प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्तींना पाहण्यासाठीही लोकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबईत ७२ नैसर्गिक आणि २६ कृत्रिम स्थळांवर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थिती आणि पुण्यातील दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुंबईतील सुमारे ५० हजार पोलिस यावेळी बंदोबस्ताकरिता रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. याशिवाय, प्रमुख चौपाटय़ांवर टेहळणीकरता पोलिसांकडून ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विसर्जन मिरवणुकांवरही सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस लक्ष ठेवून होते. आतापर्यंत मुंबईतील प्रमुख मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले असले तरी अजूनही मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे विसर्जन अद्यापही बाकी आहे. आज सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजा विसर्जनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने पोलीस आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 9:01 am

Web Title: live updates blog for ganpati visarjan sohala 2016 from mumbai
Next Stories
1 Ganpati Visarjan 2016: पुढच्या वर्षी लवकर या… राज्यभरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
2 चंद्रपूर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना शनिवारपासून ताडोबाची नि:शुल्क शैक्षणिक सहल घडणार
3 विनोद तावडेंच्या ‘त्या’ बठकीला नुटा व ‘एसीयुएसएटी’ला निमंत्रणच नव्हते
Just Now!
X