News Flash

Vidhan Parishad election 2016 : विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी दोन जागांवर विजयी

विधानपरिषदेच्या सहा जागांचा निकाल

Vidhan Parishad election : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्चस्वाची चाचपणी करण्याच्यादृष्टीने विधानपरिषद निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये भाजप व काँग्रेसने प्रत्येकी दोन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोंदिया या सहा ठिकाणी विधान परिषदेसाठी १९ नोव्हेंबरला मतदान झाले होते. सहा जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत, नांदेडमध्ये काँग्रसेच अमर राजूरकर, गोंदियात भाजपचे परिणय फुके, जळगावमध्ये शिवसेना-भाजप युतीचे चंदू पटेल , सातारा-सांगलीत काँग्रेसच्या मोहनराव कदम आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी विजय संपादन केला. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्चस्वाची चाचपणी करण्याच्यादृष्टीने विधानपरिषद निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तत्त्वे, निष्ठा गुंडाळून आपापल्या स्वार्थासाठी परस्परांकडे मदतीसाठी हात पसरले होते. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा विचार करता विधानपरिषदेच्या जळगाव, सातारा-सांगली आणि नांदेड या जागांच्या निकालांबद्दल अनेकांना उत्सुकता लागली होती.

यापैकी जळगावची निवडणूक भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सुप्त संघर्षामुळे रंगतदार बनली होती. आतापर्यंत नेहमी बिनविरोध होणारी निवडणूक यंदा अविरोध न होणे खडसेंचे यश असल्याचे मानले जात होते. त्यामुळे या निवडणुकीत खडसे समर्थकांच्या गटाकडून भाजपला अपशकून होण्याची भीती होती. मात्र, सरतेशेवटी चंदू पटेल यांनी सर्व शक्यतांना विराम देत जळगावच्या जागेवर विजय मिळवला. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आले. मागील वेळेसची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली होती. या वेळी काँग्रेसच्या वतीने निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु खा. चव्हाणांचे कट्टर राजकीय विरोधक आ. चिखलीकर यांनी त्यांचे मेहुणे व माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना मैदानात उतरवले होते. शिंदे यांना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे ही लढत तुल्यबळ झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या अमर राजूरकर यांनी २५१ मते मिळवत ४८ मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, अशोक चव्हाणांचे नांदेडमधील आतापर्यंतचे वर्चस्व पाहता श्यामसुंदर शिंदे यांना मिळालेली २०८ मते ही विरोधकांच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या सातारा-सांगलीतील लढतीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या जागेवर काँग्रेसच्या मोहनराव कदम यांनी मिळवलेला विजय अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिल्याने पक्षाच्या बालेकिल्ल्यातच धुसफुस सुरू झाली होती. अजित पवारांच्या या निर्णयावर जयंत पाटील आणि उदयनराजे भोसले नाराज होते. त्यामुळे आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीसाठी कठीण झाली होती.

 

रोहित धामणस्कर November 22, 201611:09 am

जळगाव विधानपरिषेदत भाजपचे चंदू पटेल विजयी

रोहित धामणस्कर November 22, 201610:42 am
गोंदिया विधानपरिषदेत भाजपचे परिणय फुके विजयी
रोहित धामणस्कर November 22, 20169:53 am

सातारा विधानपरिषद निवडणूक: ५५९ मते वैध, विजयासाठी २८० मते आवश्यक, मोहनराव कदमांना ३०९ मते

रोहित धामणस्कर November 22, 20169:51 am

साताऱ्यात अजित पवारांना धक्का; पतंगराव कदमांची चाल यशस्वी

रोहित धामणस्कर November 22, 20169:49 am
सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम ६४ मतांनी विजयी
रोहित धामणस्कर November 22, 20169:49 am

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला शाबूत

रोहित धामणस्कर November 22, 20169:47 am
तानाजी सावंत यांच्याकडून काँग्रेसच्या शंकर बढे यांचा पराभव; शंकर बढे यांना ७८ मते
रोहित धामणस्कर November 22, 20169:46 am
यवतमाळ विधानपरिषदेत तानाजी सावंत यांना ३४८ मते
रोहित धामणस्कर November 22, 20169:46 am
यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेचा निकाल जाहीर; शिवसेनेचे तानाजी सावंत ३४८ मते मिळवून विजयी
रोहित धामणस्कर November 22, 20169:46 am
अशोक येनपुरे आणि संजय जगताप यांचा पराभव; अनिल भोसले ४४० मते मिळवून विजयी
रोहित धामणस्कर November 22, 20169:46 am
पुणे स्थानिक मतदार संघातील मतमोजणी एकुण मतदान ६५८, प्राथमिक छाननीमध्ये ८ मते बाद. एकुण वैध मते ६५०
रोहित धामणस्कर November 22, 20169:46 am
पुणे विधानपरिषद निवडणूक निकाल जाहीर; राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले विजयी
रोहित धामणस्कर November 22, 20169:45 am
नांदेड विधानपरिषदेत काँग्रसचे अमर राजुरकर २५१ मते मिळवून विजयी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 9:42 am

Web Title: live vidhan parishad election in maharashtra
Next Stories
1 ‘भाजप-सेनेची भीती दाखवून काँग्रेस-राष्ट्रवादी मते मागतात’
2 बालसाहित्याने मुलांच्या ‘माणूसपणा’ला हात घालावा!
3 बोगस पटसंख्या दाखवून आदिवासी आश्रमशाळेत अनुदानाची लूट
Just Now!
X