राज्य सरकार निर्मितीच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करीत नसल्यामुळे राज्यात विजेची टंचाई निर्माण होऊन भारनियमन केले जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भोकरदन येथे केला. भाजपने आयोजित केलेल्या दुष्काळी मोर्चासमोर ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, की दहा हजार मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता राज्यात असली, तरी प्रत्यक्षात पाच हजार मेगावॉट विजेचीच निर्मिती करण्यात येते. कमी वीजनिर्मिती करून राज्यात वीजटंचाई असल्याचे भासवून भारनियमन केले जाते. राज्यातील सिंचन प्रकल्पांवर खर्च झालेले ७० हजार कोटी रुपये नेमके कुठे गेले, असा सवाल करून ते म्हणाले, की राज्यात महायुती सत्तेवर आल्यानंतर या खर्चाच्या प्रत्येक पैशाचा हिशेब देण्यात येईल.
राज्यातील शेतकऱ्यांचे गारपिटीने नुकसान झाले असताना त्यासाठी मदतीचे वाटप करतानाही भेदभाव करण्यात आला. सत्ताधारी आघाडीतील मंडळींनीच या मदतीचा लाभ घेतला. राज्य सरकार आपल्या प्रगतीसंदर्भात ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ या घोषवाक्याखाली खोटय़ा जाहिराती करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संतोष दानवे यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार चंद्रकांत दानवे यांच्यावर टीका केली. राज्यातील आघाडी सरकार विकासात अयशस्वी ठरले, तसेच आमदार दानवेही विकासकामांसंदर्भात अयशस्वी ठरल्याची टीका त्यांनी केली.