लाभार्थ्यांना वाटप केलेले प्रमाणपत्र परत घेतले

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्याचे सर्वत्र गाजावाजा करीत कार्यक्रम घेण्यात आले. असाच कार्यक्रम हिंगोलीतही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. मात्र या कार्यक्रमातून शासनाची बनवाबनवी उघड झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र थाटात वाटप केले, ते कार्यक्रम संपण्यापूर्वीच परत घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची खाती बडोदा बँकेत असताना अनेक लाभार्थ्यांना मात्र प्रमाणपत्र वाटप केले ते खाते शिराढोण मराठवाडा ग्रामीण बँकेत असल्याची नोंद शासनाने जाहीर केलेल्या यादीतून स्पष्ट झाली आहे. हिंगोली जिल्ह्णाात शिराढोण नावाचे एकही गाव नाही. शिराढोण नेमके कोणत्या जिल्ह्णाात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून एक शिराढोण गाव हे उस्मानाबादेतील कळंब तालुक्यात आहे. त्यामुळे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम निव्वळ बनवाबनवीच असल्याचे तर उघड झालेच आहे, शिवाय कर्जवाटपात इतर जिल्ह्य़ातील बँकेचा सहभाग कसा, असे अनेक प्रश्नही या निमित्ताने पुढे आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात १८ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्णाातील २५ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये साटंबा, इंचा, भांडेगाव व माळहिवरा येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्या काही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, त्यामध्ये साटंबा येथील धनाजी लक्ष्मण घ्यार या शेतकऱ्याचे हिंगोलीतील बडोदा बँकेत खाते असून त्याच्यावर ६० हजारांचे कर्ज होते. याचप्रमाणे केवळाबाई तपासे, हरीश घ्यार, कैलास तपासे, कमलाबाई चाटसे, दत्ता जाधव, पुंजाबाई ठाकरे, नारायणराव जगताप, सोपान तपासे, पंडिता चाटसे, वैजनाथ घ्यार, पिंजाबाई चाटसे, सुनीता चापटे, रामजी साबळे, शांताबाई तपासे, कांताबाई टापरे, श्रीपती लोणकर, ज्ञानेश्वर घ्यार, लक्ष्मीबाई घ्यार, शंकर आठवले यासह एकूण २५ लाभार्थी शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हे प्रमाणपत्र वाटप होतात न होतात तोच कार्यक्रम संपण्यापूर्वी साटंबा येथील अनेक शेतकऱ्यांचे  प्रमाणपत्र भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने परत जमा करून घेतले. तर वैजनाथ घ्यार यांनी मात्र मिळालेले प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

या संदर्भात धनाजी घ्यार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, बडोदा बँकेत खाते असून ६० हजारांचे कर्ज असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून प्रमाणपत्र दिले होते. माझ्यासह सोपान तपासे, सुभद्राबाई ज्ञानबा घ्यार, कैलास तपासे, हरी दर्याजी घ्यार, श्रीराम सखाराम घ्यार यांच्यासह इतरांना दिलेले प्रमाणपत्र काही बँकेतील दुरुस्तीचे काम बाकी असल्याचे कारण सांगून परत घेतल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

वास्तविक पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करून कर्जमुक्तीसंदर्भात शासनाकडून मोठा डांगोरा पिटविला जात आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात कर्जमुक्तीच्या नावाखाली भाजपकडून मोठ मोठे बॅनर लावले आहेत. मात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच्या नावाखाली कशी बनवाबनवी झाली हे वाटप केलेले प्रमाणपत्र परत घेतल्यावरून उघड झाले आहे. इंचा येथील ज्या शेतकऱ्यांचे खाते बडोदा बँकेत असताना प्रसिध्द झालेल्या यादीत मात्र त्यांच्या नावापुढे ‘शिराढोण’ येथील एमजीबी (मराठवाडा ग्रामीण बँक) बँकेत खाते दाखविले आहे. त्यामुळे ही बनवाबनवी उघड झाली आहे.

शासनाने दिवाळीला कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २५ शेतकऱ्यांना सोपस्कार म्हणून प्रमाणपत्र वाटप केले. परंतु इतरही प्रक्रिया होण्यास जवळपास महिन्याचा काळ लागण्याची शक्यता खुद्द पालकमंत्र्यांनीच वर्तवली. त्यातच बँकेमध्ये शेतकरी गेल्यास त्यांना कोणी दाद लागू देत नाही. तर अडीच लाखापैकी १.७१ लाख जणांचेच अर्ज आले. त्यापैकी किती अपात्र आहेत, याचा अद्याप थांगपत्ता नाही. हिरवी, पिवळी व लाल यादी तयार असल्याचे सांगितले जाते. पिवळ्या व लाल यादीतील लाभार्थीची चिंता मात्र वाढणार असली तरीही याद्या कधी जाहीर होतील, असा प्रश्न कायम आहे.