महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्य़ातील ३६ हजार कर्जदारांना लाभ मिळणार असून अंदाजित १४१ कोटीची कर्जमाफी मिळेल, अशी प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, या योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १६ हजार खातेदार असून त्यांना ३६ हजार ४१ लाख रुपये कर्जमाफी मिळू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न करणे अनिवार्य आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर ही सुविधा मिळणार असून कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. शेती आणि शेतीशी निगडित कामासाठी शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांत राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून काही वर्षांत शेती कर्जाची मुदतीत परतफेड झाली नाही. कर्जाच्या दृष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे नव्याने पीक कर्ज घेऊ  शकत नाहीत. यावर २०१९-२० च्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्य़ात शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी अतिशय सोपी पद्धत ठेवली आहे. कोणालाही अर्ज करण्याची गरज नाही. जिल्ह्य़ात ७८४ आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. तेथे जाऊन संबंधितांनी आपला आधार क्रमांक कर्ज खात्याशी जोडायचा आहे. त्यानंतर अंगठा उमटवला की, संबंधित शेतकऱ्यांचे खाते आणि कर्जाची रक्कम येते. पूर्ण शहानिशा झाल्यानंतर त्या शेतकऱ्याचे कर्जमाफ होणार असून तसे कर्ज प्रमाणपत्रही दिले जाईल. त्याच्या जमिनीवर असलेला बोजा त्या आधारे कमी होऊन शेतकरी कर्जमुक्त होईल. आधार क्रमांकाशी खाते जोडण्यात न आलेल्या शेतकऱ्यांची यादी ७ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या कर्जदाराची मुदत आणि व्याज मिळून रक्कम २ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नमूद केले.