सांगली आणि कोल्हापुरात पुराचा कहर होता जो सगळ्या महाराष्ट्रानेच पाहिला. आता पूरग्रस्ताना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आपली तयारी सुरु केली आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना 1 हेक्टरवरील नुकसानावरचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुरामध्ये ज्यांची घरं कोसळली आहेत त्यांनाही सरकार मदत करणार आहे. सांगली आणि कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना सरकराने मोठा दिलासा दिला आहे.

एक हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांनी जे काही पिक घेतलं असेल, त्यासाठी जे नियमाने कर्ज मिळतं तेवढं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने ऊस लावला असेल तर त्याला जे जास्तीत जास्त कर्ज मिळतं ते माफ केलं जाणार आहे. ज्यांनी कर्ज घेतलं नाही आणि तरीही त्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे जी नुकसान भरपाई दिली जाते त्याच्या तिप्पट भरपाई राज्य सरकारतर्फे दिली जाणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

कोसळलेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शिवाय ज्यांची घरं कोसळलेली आहेत त्यांना एक लाखाची अतिरिक्त मदतही केली जाणार आहे. पाच ब्रास वाळू आणि पाच ब्रास मुरुमही दिला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ज्या छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना 50 हजारांपर्यंत मदत दिली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. रोगराई, महामारी पसरु नये यासाठी तातडीची पावलं उचलली जात आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्यांची घरं कोसळली आहेत, आणि बांधणी सुरु करण्यात येणार आहे अशांना घर बांधून होईपर्यंत पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत त्यांना भाडे तत्त्वावर रहावे लागणार आहे.  भाडे तत्त्वावर राहण्यासाठी ग्रामीण भागातल्या कुटुंबाला प्रत्येकी 24 हजार रुपये तर शहरी भागातील कुटुंबीयांना प्रत्येकी 36 हजार रुपये अतिरिक्त मदत केली जाणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अनेक संस्था पुढे येऊन गावं दत्तक घेण्याचा विचार करत आहेत. त्यांना आम्ही हे सांगतो आहोत की आम्ही जी मदत करतो आहोत त्यात त्यांनी भर घालावी. घरासोबत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन, सांडपाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा या सगळ्या गोष्टीही कराव्या लागणार आहेत. ज्या खासगी संस्थांना गावं दत्तक घ्यायची असतील त्यांची मदत आम्ही यासंदर्भात घेऊ असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं