पालघर : भाजप – शिवसेना युतीत शिवसेनेला सोडण्यात येणारी एक अतिरिक्त जागा ही पालघरची असल्याची चर्चा सुरू झाल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेला सोडू नये, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पूर्वीचा डहाणू आणि आताचा पालघर (राखीव) मतदारसंघ पारंपरिकदृष्टय़ा भाजपचा गड मानला जातो. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपचे चिंतामण वनगा यांनी १९९६ मध्ये प्रथम विजय संपादन केला होता. यानंतर भाजपला तीनदा यश मिळाले. आदिवासीबहुल भागात भाजपने नवे नेतृत्व पुढे आणले नाही. वनगा आणि विष्णू सवरा हे दोनच जिल्ह्यातील नेते. वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजपकडे प्रभावी उमेदवार नव्हता. यामुळे काँग्रेसमधील राजेंद्र गावित यांना आयात करावे लागले. अटीतटीच्या लढतीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेकडून लढलेले वनगा यांच्या पुत्राचा पराभव केला होता.

वनगा पुत्राने दिलेल्या लढतीमुळेच शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेने मागे १९९६ मध्ये भाजपच्या ताब्यातील ठाणे मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. तेव्हापासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत गेली. आता पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिल्यास ठाण्याप्रमाणेच पालघरमध्ये गत होईल, अशी भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे. पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याचा दावा केला जात असला तरी याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे पालघरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. खासदार राजेंद्र गावित यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे पालघर लोकसभेच्या जागेसाठी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची आशा अजूनही कायम आहे. दुसरीकडे शिवसेनेने पक्ष बांधणी व पुनर्रचनेसाठी जोमाने हालचाली सुरू केल्या असून पालघरच्या जागेवर आपला दावा बोलला आहे.  शिवसेना-भाजपा युतीच्या संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकी दरम्यान पालघर लोकसभेचा विषय पुढे येतात यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या समक्ष ठरले होते. असे सांगून पालघरबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पालघरच्या शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले.

शिवसेनेला जागा सोडण्यासाठी पालघरबरोबरच हातकणंगलेचा पर्याय आहे. शिवसेनेकडून खासगी संस्थामार्फत या दोन्ही जागेसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येत असून त्याच्या वर पुढील निर्णय अवलंबून आहे असे सांगण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार गावित यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

शिवसेनेकडून पक्षबांधणी

शिवसेनेने पक्षबांधणीच्या कामाला जोमाने सुरुवात केली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका प्रमुख तसेच प्रमुख कार्यकर्ताना दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर बोलाविण्यात आले होते. जे पदाधिकारी सक्रिय नाहीत त्यांना बदलून नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करा तसेच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांला निवडणूकसाठी सज्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  त्या अनुषंगाने जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोईसर चारोटी आमदार रवींद्र फाटक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.