जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून होणारी ग्रामीण विकासाची कामे निकृष्ट दर्जाची नको तर दर्जेदार काम करा. सावंतवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून आदर्श काम करून राज्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी यापुढे काम करू या, असे आवाहन वित्त व ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ग्रामीण भागात पर्यटनालाही चालना देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी रात्री पंचायत समिती सावंतवाडीला भेट दिली. त्यांचे स्वागत केल्यानंतर बोलत होते. यावेळी सभापती प्रमोद सावंत, उपसभापती महेश सारंग, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम व मान्यवर उपस्थित होते. मी कोणाशीही द्वेषभावनेने वागणार नाही अशी शपथ घेतली आहे. जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असून तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका देण्यासाठी प्रयत्न करीत, अशी ग्वाही ना. केसरकर यांनी दिली. पंचायत समितीची प्रशासकीय आदर्शवत इमारत उभारणीसाठी पुढाकार घेईन, असे ते म्हणाले.
केंद्र व राज्य शासनाच्या योजना आणि मंत्र्याशी समन्वय साधून विकास साधला जाईल. केंद्र सरकारची ग्रामीण विकास योजना महिलांना रोजगार देणारी आहे. त्यासाठी पुढाकार घेईल. तसेच घरोघरी शौचालय व्हावे आणि पर्यटनस्थळी पे अ‍ॅण्ड युज शौचालय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ना. दीपक केसरकर म्हणाले.
दारिद्रय़ निर्मूलनासाठी योजनाचा पाठपुरावा करणार असून त्याला दुष्काळी आर्थिक टंचाईचा अडथळा येणार नाही. तसेच नवीन दारिद्रय़रेषेखालील यादी मान्यतेला केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, तसेच सावंतवाडी पंचायत समिती आदर्श पंचायत समिती निर्माण करणारा आराखडा तयार करा, असे आवाहन यंत्रणेला दीपक केसरकर यांनी केले.
अवकाळी पावसाने भातशेती, आंबा, काजू अशा फळबागायतीचे नुकसान झाले आहे. त्याला भरपाई मिळकत देण्याचा प्रयत्न करणार आहे असे सांगून ग्रामपंचायत पातळीवर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जावे, असे ना. केसरकर म्हणाले.
ग्रामपंचायतीच्या इमारती नवीन उभारण्यासाठी निर्लेखित करून प्रस्ताव द्या, असे आवाहन केले. विजेबाबतची समस्या आणि वीजवाहिन्या बदलाबाबत जिल्हाभरातच लक्ष दिले जाणार असून सावंतवाडी तालुक्याचा आराखडा बनला आहे. सावंतवाडी शहरातील ४० वर्षांपेक्षा जास्त काळातील वीजवाहिन्या होत्या त्या बदलण्यात येत आहेत, असे ना. केसरकर म्हणाले.
यावेळी सभापती प्रमोद सावंत यांनी तालुक्यातील वीज समस्या जाणून घ्यावी, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानी मिळावी तसेच पंचायत समिती नवीन इमारत बांधकामाला साथ द्यावी, असे काही मुद्दे सावंत यांनी मांडले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ग्रामीण विकास योजना व अंमलबजावणीसाठी जिल्हा सतर्क राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, राघोजी सावंत, अशोक दळवी, जि. प. सदस्या सौ. जाधव, पार्वती हिराप, बाळा जाधव, प्रकाश परब, रुपेश राऊळ, राजू नाईक, लाडोजी केरकर, गौरी आरोंदेकर, सौ. रोहिणी गावडे तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.