11 July 2020

News Flash

दिलीप देशमुख यांची माघार

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नव्या उमेदवाराला संधी

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नव्या उमेदवाराला संधी

सलग तीन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लातूर-उस्मानाबाद-बीड मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप देशमुख यांनी या वेळी होणाऱ्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षातील नव्या उमेदवारांना संधी देण्यासाठी आपण माघार घेणार असल्याचे आमदार देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना जाहीर केले आहे.

लातूर, उस्मानाबाद, बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले आमदार दिलीप देशमुख यांची मुदत २१ जून २०१८ रोजी संपत आहे. २१ मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २६ एप्रिलपासून अर्ज भरले जाणार आहेत.

आमदार दिलीप देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षाने आपल्याला सलग तीन वेळा संधी दिली. आता नव्या पिढीसाठी मी संधी दिली पाहिजे. मी पूर्णपणे समाधानी आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठांनी नव्यांना संधी देऊन पक्ष सांगेल ती भूमिका पार पाडली पाहिजे. यामुळेच आपण निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

पक्ष हा मोठा आहे. तो विचार घेऊन उभा आहे. निवडणूक जिंकणे किंवा हारणे हे प्रवासातील टप्पे आहेत. आपण जर निवडणुकीच्या रिंगणात नसाल तर संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीवर दावा करेल, या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ही नसíगक प्रतिक्रिया आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या दृष्टिकोनातून भूमिका घेतो. त्यामुळे त्याबाबतीत मला काही म्हणायचे नाही. आमचे पक्षश्रेष्ठी याबाबतीत भूमिका ठरवतील.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे व राष्ट्रवादीत मताची फारशी फाटाफूट होणार नाही, असा दावा केला जातो आहे. काँग्रेसची स्थिती बेतासबात आहे. लातूर, उस्मानाबाद या दोन जिल्हय़ांत काँग्रेसची स्थिती थोडीफार बरी आहे. मात्र, बीड जिल्हय़ात काँगेसची ताकद नाही. सर्व गटातटांना बरोबर घेऊन जाईल, अशी व्यक्ती दिलीपरावांशिवाय काँग्रेसमध्ये नसल्यामुळे काँग्रेसच्या मताची फाटाफूट होऊ शकते, असे गणित मांडले जात आहे. भाजपाची स्थिती मजबूत आहे.  बीड जिल्हय़ात राष्ट्रवादीच्या बरोबर भाजपाचीही ताकद आहे. उस्मानाबाद जिल्हय़ात भाजपाची स्थिती फारशी बरी नाही. लातूर व बीड भाजपच्या मतभेदाचा फायदा राष्ट्रवादीला होईल, असा अंदाज राष्ट्रवादीची मंडळी व्यक्त करत आहेत तर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मतात फाटाफूट होईल व त्याचा लाभ भाजपाला मिळेल, असे भापजच्या मंडळींचे म्हणणे आहे. शिवसेनेची ताकद उस्मानाबादवगळता लातूर, बीडमध्ये नगण्य आहे. मात्र, शिवसेनेचे मतदान कोणाकडे जाणार त्यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. या निवडणुकीत घोडाबाजार मोठय़ा प्रमाणावर होणार हे आतापासूनच चित्र रंगवले जात आहे.

राष्ट्रवादीचा दावा

पक्ष ज्या कोणाला उमेदवारी देईल, त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांना दिलीप देशमुखांची भूमिका सांगून आपल्या पक्षाची काय भूमिका असेल, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दिलीप देशमुखांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय साधण्याची भूमिका उत्तम रीत्या पार पाडली आहे. उमेदवारीसंबंधी ते ठाम असतील व त्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचा दुसरा उमेदवार असेल, तर या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा मोठी असल्यामुळे आमचा उमेदवारीवर दावा आहे. आम्हाला काँग्रेस पक्षाची मदत हवी आहे व त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणार असल्याचे ते म्हणाले.

या वेळी या मतदारसंघात भाजपाची ताकद चांगली वाढलेली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत या मतदारसंघात आमची ताकद नव्हती. आता आम्ही निवडून येऊ शकतो इतके आमचे संख्याबळ आहे.  आम्ही एकदिलाने काम करून भाजपाचा विजय खेचून आणू.   – संभाजी पाटील- निलंगेकर, पालकमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 12:05 am

Web Title: local body elections dilip deshmukh
Next Stories
1 पराभवाच्या भीतीने भाजपकडून युतीसाठी आग्रह- रामदास कदम
2 मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी
3 अर्जुन खोतकरांचे रावसाहेब दानवेंना आव्हान
Just Now!
X