सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्याला इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्याच्या मुंबई उच्चन्यायालयाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी येथे आवाज फाऊंडेशनचे स्टॅलीन दयानंद यांची आयोजित पत्रकार परिषद मायनिंग-गौण खनिज समर्थक डंपरचालक मालकांच्या उपस्थितीमुळे झालीच नाही. मात्र स्थानिक इको सेन्सिटिव्ह समर्थकांना मायनिंग समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या तणावातून प्रा. गोपाळ दुखंडे यांना पोलिसांच्या मदतीने जावे लागले.
आवाज फाऊंडेशनने मुंबई उच्चन्यायालयात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांचा सह्य़ाद्री पट्टा इको सेन्सिटिव्ह जाहीर करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्चन्यायालयाने पर्यावरण मंत्रालयाला इको सेन्सिटिव्ह एरिया निश्चित करण्यासाठी कालावधी दिला आहे.
इको सेन्सिटिव्हची मुंबई उच्चन्यायालयाच्या याचिकेतील माहिती देण्यासाठी स्टॅलीन दयानंद यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदस्थळी प्रा. गोपाळ दुखंडे, सुरेश गवस, संदीप सावंत, अभिलाष देसाई, बळीराम परब, संभाजी सावंत, सदानंद देसाई, अर्जुन देसाई, श्रीधर देसाई, गुणाजी गवस आदी स्थानिक पर्यावरणप्रेमी दाखल झाले होते.
सावंतवाडीत पत्रकार परिषद होणार आहे ती इको सेन्सिटिव्ह जाहीर करण्यास भाग पाडणाऱ्या स्टॅलीन दयानंद यांना हे कळताच सुमारे १०० ते १५० डंपर्स चालक-मालक व मायनिंग समर्थक इंदिरा गांधी संकुलात जमा झाले होते.
आवाज फाऊंडेशनचे स्टॅलीन दयानंद पत्रकार परिषदस्थळी पोहोचलेच नाहीत. त्यांना मायनिंगसमर्थक पत्रकार परिषद आवारात जमा झाल्याचे कळले. त्यांची पाहणी झाली आणि स्टॅलीन दयानंद निघून गेले. नंतर त्यांचे नातेवाईक आजारी असल्याने ते परत गेल्याची सारवासारव करण्यात आली. पण पत्रकार परिषद झालीच नाही.
मायनिंग, गौण खनिज उत्पादन प्रकल्पावर सुमारे दीड लाख कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांची जबाबदारी कोण घेणार? स्टॅलीन दयानंद व त्यांच्या आवाज फाऊंडेशनचा इथे काय संबंध? तुम्ही स्थानिक आहात म्हणून सांगतो, या भानगडीत पडू नका? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत प्रा. गोपाळ दुखंडे व सहकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. प्रा. गोपाळ दुखंडे शांतपणे त्यांना उत्तर देत होते.
डंपर्स चालक-मालक संघटनेचे महेंद्र सांगेलकर, केतन आजगावकर, सुशांत पांगम, गजानन गायतोंडे, जितेंद्र गावकर, ज्ञानेश्वर सावंत, प्रमोद सावंत, यशवंत कुडतरकर, हुसेन मकानदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यांत मोठय़ा प्रमाणात तरुण होते.
केरळमध्ये इको सेन्सिटिव्ह लावा. आवाज फाऊंडेशनचा आवाज बंद करून आपला आवाज वाढविणार आहोत. डंपर्स बंद ठेवणाऱ्यांनी हप्ते भरा, असे सांगत डंपर्स पर्यावरणप्रेमींच्या घरी लावण्याची धमकी या वेळी समर्थकांनी दिली.
कोकणचा आवाज नारायण राणे यांच्या रूपाने आहे. तो दडपण्यासाठी विरोधकांची असणारी चाल आम्ही खपवून घेणार नाही. नक्षलवादी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढे पर्यावरणप्रेमी वैशाली पाटील, दयानंद स्टॅलीन, गाडगीळ आले तर परत पाठवू, असा इशारा त्यांनी दिला.
पोलीस नेहमीप्रमाणे उशिराच दाखल झाले. प्रा. गोपाळ दुखंडे यांच्यासह सहकाऱ्यांवर कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. प्रा. दुखंडे म्हणाले, डंपर्सना सरकारने काम द्यावे. सरकारचे विविध प्रकल्प आहेत तेथे सामावून घ्यावे. त्यांचे कर्ज व हप्ते भरून त्यांच्या हातांना काम द्यावे, अशी आपली भूमिकाआहे, असे प्रा. दुखंडे म्हणाले.