News Flash

स्थानिकांनीच कोकणचे सोने केले पाहिजे – सुमित्रा महाजन

महाराष्ट्रात कोकणसारखा निसर्गसंपन्न प्रदेश असताना आपल्याला काश्मीरला जाण्याची गरज नाही.

सुमित्रा महाजन

महाराष्ट्रात कोकणसारखा निसर्गसंपन्न प्रदेश असताना आपल्याला काश्मीरला जाण्याची गरज नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर आज पर्यटन बहरले असले तरी किनाऱ्यांवर प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर होत आहे. पर्यटन वाढविताना कोकणातील हिरवळ कायम ठेवून किनारेही स्वच्छ सुंदर ठेवणे गरजेचे आहे. तसे झाल्यास पर्यटन व्यवसाय घराघरात उभा राहील  पर्यटन वाढीसाठी सरकार काही करेल असे म्हणण्यापेक्षा स्थानिक लोकांनीच कोकणचे सोने केले पाहिजे असे प्रतिपादन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी मालवण येथे बोलताना केले.

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सकाळी मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर स्वर्गीय जयंत साळगावकर यांनी उभारलेल्या जय गणेश मंदिरास भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी जयेंद्र साळगावकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक नितीन वाळके, आपा लुडबे, गणेश कुशे, पूजा सरकारे, प्रांताधिकारी  उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, तहसीलदार रोहिणी राजपूत, नितीन तायशेटे,सौ सुरेखा वाळके डॉ परुळेकर  आदी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सुमित्रा महाजन यांचे स्वागत केले. तसेच तालुका प्रशासनाच्या वतीनेही महाजन यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सुमित्रा महाजन यांनी श्री गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी जयेंद्र साळगावकर यांनी महाजन यांना गणेशाची मूर्ती भेट दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना सुमित्रा महाजन यांनी साळगावकर कुटुंबियांशी आपले सलोख्याचे संबंध असल्याचे सांगत ज्योतिर्भास्कार जयंतराव साळगावकर यांच्या सोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, येथील जय गणेश मंदिरातील श्री गणेशावर आपली अपार श्रद्धा आहे. या आधी आपण आलो तेव्हा स्व. जयंतराव साळगावकर यांनी या मंदिराचे महात्म्य आपणास सांगितले होते. येथे व्यक्त केलेली प्रत्येक मनोकामना गणराया पूर्ण करतो असा माझा अनुभव आहे. म्हणूनच जयंतरावांच्या सांगण्यावरून आपण देशहितासाठी भाजपाची सत्ता देशात यावी असे साकडे गणराया चरणी घातले होते आणि माझी मनोकामना गणरायाने पूर्णही केली. म्हणूनच आज आपण येथे पुन्हा एकदा गणेशाच्या चरणी लिन होण्यास आले असे त्यांनी सांगितले. यावेळी सुमित्रा महाजन यांनी चिपळूणच्या आपण माहेरवाशीण असून मध्यप्रदेश इंदौर मध्ये आपले सासर आहे. या भागातील प्रश्न सोडविणे हे मी माझे कर्तव्य समजते. मी मंत्री नाही. त्यामुळे आश्वासन वगरे काही देणार नाही. मात्र इथल्या विकास प्रकल्पांना काही अडथळे असतील तर आपण मदत करू. येथील सिंधुदुर्ग किल्ला हा सर्वात जुना आणि सागरातील किल्ला आहे. मागच्या मालवण भेटीत मी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी तेथे प्लास्टिकचा खच मला आढळला होता. या गोष्टी पर्यटनाला मारक आहेत. किल्ल्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रस्ताव पाठवा. विकासासाठी निश्चित आपण प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या.

कोकणच्या पर्यटन विकासाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, कोकणच्या विकासासाठी केंद्रातील मंत्री सक्षम आहेत. त्यांचा वापर येथील जनतेने करून घेतला पाहिजे. येथील किनारयाची स्वच्छता कायम ठेवल्यास पर्यटन आणखी वाढेल. तसेच झाडे तोडू नका अन्यथा येथील निसर्गसौन्दर्य नष्ट होईल. कोकणच्या निसर्ग सौंदर्यामुळे व सागर किनाऱ्यांमुळे येथे पर्यटन वाढले आहे. येथील सौंदर्य नष्ट झाल्यास पुन्हा पर्यटनासाठी काश्मीरलाच जावे लागेल. सुंदर निसर्गाचा समतोल आणि स्वच्छता निरंतर ठेवणे स्थानिकांचीच जबाबदारी आहे. मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याचेही संवर्धन होणे व स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी किनारपट्टीवर लागू केलेल्या जाचक सीआरझेड कायद्यामुळे पर्यटन विकासात येत असलेल्या अडचणींबाबत सुमित्रा महाजन यांना विचारले असता त्या म्हणाल्या, सीआरझेड कायद्यामुळे महाराष्ट्रसह देशाच्या दक्षिण भागातील किनारी राज्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कायद्यामुळे पर्यटन बांधकामांध्ये अडचणी येत असल्याने त्यात शिथिलता गरजेची आहे. सीआरझेड प्रश्नावर सर्वानी एकत्रित संघर्ष करून शिथिलीकरणासाठी मागणी करणे   आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी नगरपालिकेच्या वतीने नगरपरिषद शतक महोसत्व चे निमंत्रण नगराध्यक्ष महेश कंदलगावकार यांनी दिले

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या या मालवण भेटीत त्यांनी कोकणच्या सौदर्यावर मुक्तकंठाने प्रशंसा केली त्या म्हणाल्या देवाने दिलंय अथांग…राखणं आपल्या हातात आहे …इथल्या झाडांची तोड झाली तर कोकणचे काश्मीरपण लोप पावेल असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 1:42 am

Web Title: local people should clean konkan for tourism development says sumitra mahajan
Next Stories
1 चक्रीवादळाने बांदा परिसराचे नुकसान
2 राजापुरात गंगा अवतरली
3 कर्जमुक्ती न झाल्यास लढाई!
Just Now!
X