स्थानिकांना नोकरीची संधी, गावासाठी ४० लाखांचा निधी

पालघर : धाकटी डहाणू ग्रामपंचायत हद्दीतील डहाणू खाडी परिसरात खासगी कंपनीमार्फत कोळसा उतरविण्यासाठी प्रस्तावित जेट्टी बांधण्यात येणार आहे. या मोबदल्यात प्रत्येक घरातील व्यक्तीला वाहन विकत घेण्यासाठी हमी, कंपनीमार्फत गावच्या विकासासाठी वर्षांकाठी ४० लाख रुपयांचा निधी आणि जेट्टीतून निर्माण होणाऱ्या कामांमध्ये स्थानिकांना रोजगार आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असा प्रस्ताव ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, विशेष ग्रामसभेमार्फत प्रस्तावित जेट्टीला ना हरकत प्रमाणापत्र न देण्याचा ठराव संमत करण्यात आला.

खासगी कंपनीने ना हरकत दाखल्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आहे. प्रकल्पाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीसमोर नोकरी आणि व्यवसायाचा प्रस्ताव ठेवला आहे. या ठिकाणी जेट्टी उभी राहिल्यास कोळशाची समुद्रातून वाहतूक सुरू होईल. त्यानंतर रस्ते मार्गे कोळसा औष्णिक वीज प्रकल्पात नेला जाईल. अदानी वीजनिर्मिती केंद्रासाठी मोठय़ा प्रमाणात कोळसा समुद्रमार्गे आणला जातो. यासाठी कोळसा आणलेले एक मोठे जहाज समुद्राच्या मध्यभागी उभी असते. तेथून ताराफ्याच्या (बार्ज) साहाय्याने कोळसा वाहतूक अदानी वीज निर्मिती प्रकल्पात केली जाते. या ठिकाणी जेट्टी उभारल्यास कोळशाच्या वाहतुकीत वाढ होणार आहे.

ग्रामस्थांचा विरोध का?

धाकटी डहाणूतील ग्रामस्थांनी जेटीला विरोध केला आहे. पालघर जिल्ह्य़ात विविध विनाशकारी प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. प्रकल्पांमुळे स्थानिक भूमिपुत्र, मच्छीमार, आदिवासी बाधित होणार असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी गेली तीन वर्षे ग्रामस्थांकडून केली जात आहे. डहाणू येथील औष्णिक वीज प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या कोळशाच्या राखेची वाहतूक केली जाते. ती करताना पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वाहतूक करताना कोळशाची राख हवेत मिसळते. ती सुक्या मासळी, आजूबाजूच्या कोलंबी संवर्धन प्रकल्प, शेती, बागायतींवर पसरली जाते. त्यामुळे डहाणू गावाजवळील शासकीय खाजण जमिनीवर जेट्टी बांधण्यासाठीचा प्रस्तावाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.